मीरा रोड : सलग दोन दिवस निवडणुकीचे काम करणाऱ्या सुमारे ३५० मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदानाच्या दिवशी दिला जाणारा भत्ता ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी न दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. अन्य मतदारसंघातील निवडणूक अधिकाºयांनी भत्ता कालच वाटला असताना केवळ आमच्यावरच अन्याय का, असा सवाल करत मीरा भाईंदर कामगार सेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.
मतदानाच्या आदल्या दिवशी ओळख चिठ्ठी वाटप आदी कामांसाठी आणि मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रातील कामासाठी असे सलग दोन दिवस काम केल्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांना प्रती दिवस चारशे रुपयांप्रमाणे दोन दिवसांचा आठशे रुपये भत्ता दिला जातो. मतदानाच्या दिवशीच सायंकाळी त्यात्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यामार्फत रोखीने हा भत्ता वाटला जातो. परंतु ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघ क्र. १४६ मधील मतदान केंद्र अधिकाºयांना सोमवार २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होऊनदेखील देय भत्ता वाटलाच नाही.
अन्य मतदारसंघातील मतदान केंद्र अधिकाऱ्यांना मतदाना दिवशीच रोखीने भत्ता मिळाला असताना, आपणास भत्ता न मिळाल्याने कर्मचारी नाराज आहेत. भत्ता न मिळाल्याने एका कर्मचाºयाने संताप व्यक्त करत आमचे मानधन द्यायची दानत नसेल तर यापुढे बीएलओ म्हणून बोलावू नका, जी कारवाई करायची ती करा, असे खडे बोल सुनावले.
दोन दिवसांत भत्ता जमा करण्याचे आश्वासन मिळालेसदर मतदारसंघात ४३२ मतदान केंद्रे आहेत. त्यातील मीरा भाईंदरच्या हद्दीत सुमारे २०० मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असतो. प्रत्यक्षात सुमारे ३५० कर्मचारीच मतदानाच्या दिवशी आले होते. भत्ता मिळाला नाही म्हणून कालपासूनच मतदान अधिकाऱ्यांकडून सतत विचारणा केली जात होती. निवडणुकीसाठीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्येदेखील अनेकांनी भत्ता मिळाला नसल्याबद्दल विचारणा केली. त्यावेळी अधिकाºयांकडून मात्र दोन दिवसांत तुमच्या खात्यात भत्ता जमा करु असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
बीएलओंना नेमके मानधन किती द्यावे, यावर एकवाक्यता नव्हती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अभिप्राय घेऊन दोन दिवसात त्यांना मानधन त्यांच्या खात्यात वा कसे द्यायचे, याचा निर्णय घेतला जाईल. - सतीश बागल, निवडणूक अधिकारी, ओवळा माजिवडा
मतदान केंद्र अधिकारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशीच ८०० रु. भत्ता रोखीने देणे आवश्यक होते. अन्य मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना भत्ते दिलेदेखील. मग आमच्यावरच अन्याय कशाला? सलग दोन दिवस काम करुन भत्ता न दिल्याने कर्मचारी नाराज आहेत. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. - कैलास शेवंते, सचिव,मीरा भाईंदर कामगार सेना