उल्हासनगर : उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी अनिक्षा जयसिंघानी हिला न्यायायाने जामीन दिल्यानंतर ती उल्हासनगरातील तिच्या घरी न येता, अज्ञातस्थळी गेल्याने, चर्चेला उधाण आले. उल्हासनगरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी व माजी नगरसेवक अनिल जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा हिने अमृता यांना ब्लॅकमेलिंग करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मुंबईतील मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
अनिक्षापाठोपाठ अनिल याला पोलिसांनी अटक केली. मंगळवारी तिला न्यायालयाने जामीन दिल्यावर, ती उल्हासनगर येथील घरी येईल, असा पोलिसांसह नागरिकांचा कयास होता. मात्र अनिक्षा उल्हासनगर येथील घरी न आल्याने, ती अज्ञातस्थळी गेल्याची चर्चा आहे. तिच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष असून ती वडिलांच्या जामिनासाठी प्रयत्न करीत असल्याचे बोलले जाते.
अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्यांचे नाव घेण्यासाठी जयसिंघानी कुटुंबावर दबाव असल्याचेही बोलले जात असून स्थानिक पोलिस अनिक्षाच्या घरी येण्याकडे लक्ष ठेवून आहेत. तसेच ती कोणाच्या संपर्कात आहे त्याची चौकशी करण्यात येणार आहे.