ठाणे : स्थायी समिती सभापतीपदी नरेश म्हस्के यांची निवड झाल्याने रिक्त झालेल्या सभागृह नेतेपदाच्या शर्यतीत अनेक मातब्बर असतांना पक्ष श्रेष्ठींनी ठाण्यात सभागृह नेतेपदी अॅड. अनिता गौरी यांची निवड केली आहे. मंगळवारी झालेल्या या निवडीने त्या ठाणे महापालिकेतील पहिल्या महीला सभागृहनेत्या ठरल्या आहेत. मुंबई महापालिकेत तृष्णा विश्वासराव यांची मागील वर्षी सभागृह नेतेपदी निवड झाली होती. तीच परंपरा ठाण्यातही शिवसेनेने कायम ठेवली आहे.गेल्या आठवड्यात रिक्त झालेल्या सभागृह नेतेपदाच्या शयर्तीत माजी महापौर अशोक वैती, नरेश मणेरा, विलास सामंत, दशरथ पालांडे, राम एगडे आदींसह, अनिता गौरी, मीनाक्षी शिंदे, अनिता बिर्जे आदी महिला सुध्दा शर्यतीमध्ये होत्या. अखेर या सर्वांना पिछाडीवर टाकत अनिता गौरी यांनी यात बाजी मारली असून त्यांची मंगळवारी सभागृह नेतेपदी निवड झाली. दरम्यान सुरवातीला अशोक वैती यांचे नाव अंतिम मानले जात होते. परंतु त्यांचे नाव डावलण्यात आल्याने अनिता बिर्जे यांच्यासह मीनाक्षी शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. परंतु अखेर गौरी यांची या पदावर निवड झाली आहे. त्या सलग दोन वेळा निवडून आल्या आहेत. त्यांनी महापौरपदासाठीही चार ते पाच वेळा आग्रह धरला होता. परंतु त्यांना डावलण्यात आल्याने त्या नाराज होत्या. विशेष म्हणजे कळव्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य असतांना गौरी या शिवसेनेतून निवडून येत आहेत. एकूणच उपमहापौर पद कळव्याला दिल्यानंतर आता पुन्हा कळवा पट्यात शिवसेनेला वाढविण्यासाठी गौरी यांची निवड केल्याचीही चर्चा सध्या सुरु आहे. (प्रतिनिधी)सर्व पदे वागळेलाच का...यापूर्वी सर्वच पदांचा मान हा वागळे इस्टेट आणि कोपरी भागातील शिवसेनेच्या मंडळींनाच मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीचे तिकीट असो अथवा, महापौरपदाची लॉटरी आदींसह इतर महत्वाच्या पदांवर देखील वागळे पट्याचाच वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे सर्व पदे वागळे इस्टेटलाच का असा काहीसा वादही गेले दिवस शिवसेनेत रंगला होता. त्यामुळेच कदाचित आता, वागळे पट्याला वगळून कळव्याला न्याय देण्याचा प्रयत्न पक्ष श्रेष्ठींनी केला असल्याचेही बोलले जात आहे. विरोधकांना शांत करणे अशक्यसध्या ठामपात महासभेचा कारभार अनागोंदी पध्दतीने सुरु आहे. कधी काय होईल हे सांगणे एकाही सदस्याला शक्य नाही. प्रत्येक महासभेत विरोधक जेव्हा आक्रमक झाले आहेत, तेव्हा त्यांना शांत करण्याची धमक नरेश म्हस्के यांनी दाखविली होती. तो समन्वय गौरी या कशा साधतात हे पहावे लागेल.
सभागृह नेतेपदी अनिता गौरी
By admin | Published: May 06, 2015 1:43 AM