बदलापूर : कुळगाव- बदलापूर नगरपालिका शहरातील धोकादायक इमारतींबाबत बेफिकीर असल्याचा आरोप भाजपा शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी केला आहे. नगरपालिकेने ३० मे पूर्वी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करणे आवश्यक होते. परंतु अद्याप ती जाहीर केलेली नाही. ती तातडीने जाहीर करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.पावसाळयात धोकादायक इमारती वा त्यांचा काही भाग कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर पालिका, महापालिका पावसाळयापूर्वी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करत असतात. त्याप्रमाणे बदलापूर नगर पालिकेकडूनही शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर होणे अपेक्षित होते. असे असताना बदलापूर नगरपालिकेने मात्र अद्याप धोकादायक इमारतींची यादी जाहीर न केल्याने नगरपालिका प्र्रशासन याबाबत बेफिकीर असल्याचे दिसून येते असा आरोप शिंदे यांनी केला आहे.नगरपालिका हद्दीत अनेक इमारती धोकादायक आहेत. येथे राहणारे अनेक लोक स्ट्रक्चरल आॅडिटबाबत उदासीन असतात. परंतु काही नागरिकांना दुसरा पर्याय नसल्याने धोकादायक इमारतीत रहावे लागते. अनेक नागरिकांनी त्यांच्या धोकादायक अवस्थेतील इमारती धोकादायक जाहीर करण्यासाठी नगरपालिकेकडे अर्ज केले आहेत. अशा अर्जांवर नगर पालिकेने तातडीने कार्यवाही करावी, असे ते म्हणाले.
धोकादायक इमारती जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 2:42 AM