कल्याण : एका शाळेत शिक्षक असलेल्या लखीचंद तायडे यांना कोरोना झाल्याने त्यांनी खासगी कोरोना रुग्णालयात उपचार घेतले. मात्र, त्यांच्यावरील उपचाराचे बिल चुकीच्या पद्धतीने आकारण्यात आल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेत धाव घेतल्याने जागरूक नागरिकाच्या मदतीने बिलात दुरुस्ती केल्याने तायडे यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना झाल्याने तायडे यांनी कल्याण-मुरबाड रोडवरील खासगी कोविड रुग्णालयात उपचार घेतले. या रुग्णालयात तायडे १६ दिवस उपचार घेत होते. त्यांच्या उपचारांचे एकूण बिल एक लाख ४८ हजार ६०० रुपये झाल्याने रुग्णालये सांगितले. तायडे यांनी तीन लाखांचा आरोग्य विमा काढलेला आहे. २० हजार रुपयांची राेकड रुग्णालयास अनामत रक्कम भरली होती. मात्र, जास्तीचे बिल आकारल्याने त्यांनी जागरूक नागरिक उल्हास जामदार यांच्याकडे धाव घेतली. त्यांना हा प्रकार निदर्शनास आणून दिला. जामदार यांनी तायडे यांना घेऊन त्यांच्या बिलाची प्रत पालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखवली. तेव्हा संबंधित अधिकाऱ्याने रुग्णालयाशी संपर्क साधून बिल चुकीचे असल्याचे लक्षात आणून दिले. त्यानंतर हे बिल कमी करून त्यांना ९९ हजार ६०० रुपये भरण्यास सांगितले. जामदार यांनी चुकीचे बिल आकारणाऱ्या रुग्णालयाविरोधात कारवाईची मागणी केली आहे. पालिकेने खासगी कोविड रुग्णालयातून होणारी रुग्णांची लूट रोखण्यासाठी ऑडिटर्स नेमले असल्याचे सांगितले होते, मात्र संबंधित रुग्णालयात ऑडिटर्स नसल्याने यापुढेही या रुग्णालयात असा प्रकार घडू शकतो, अशी शक्यता जामदार यांनी व्यक्त केली आहे.
-----------------