ठाणे - कोणार्क एक्स्प्रेसने रविवारी ठाणे रेल्वेस्थानकात आलेल्या तरुणीसोबत छेडछाडीचा प्रकार घडल्यानंतर त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली. तातडीने रेल्वे प्रशासनाने ठाणे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमे-यांबाबत सर्व्हे केला. आणखी ३० सीसीटीव्ही कॅमेºयांची गरज असल्याची बाब निदर्शनास आली.नालासोपाºयातील अठरावर्षीय तरुणी शनिवारी रात्री भुवनेश्वर येथून कोणार्क एक्स्प्रेसने मुंबईकडे निघाली होती. रविवारी पहाटे ती ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक-६ वर दाखल झाली. त्यानंतर, काही मिनिटांत पुन्हा गाडी मुंबईकडे रवाना होत असताना, एक्स्प्रेसच्या बी-१ बोगीत एका अनोळखी व्यक्तीने शिरून तिची छेड काढली, अशी तक्रार त्या तरुणीने टिष्ट्वटद्वारे मुंबई पोलीस आयुक्तांसह काही वृत्तवाहिन्यांना केली होती. त्यानंतर, याप्रकरणी सायंकाळी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, पोलीस तपासात ज्या फलाटावर हा प्रकार घडला, तेथे सीसीटीव्ही नसल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी इतर फलाटांवरील सीसीटीव्ही कॅमेºयांची मदत घेतली. रेल्वे प्रशासनाने तातडीने ठाणे स्थानकातील सीसीटीव्हींचा सर्व्हे केला. यावेळी स्थानकात सुरू असलेल्या कामांमुळे आणि फलाटांची वाढलेली लांबी यामुळे या ठिकाणी सीसीटीव्हींची गरज असल्याचे स्पष्ट झाले. या सर्व्हेअंती ३० ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली आहे. सध्या ठाणे रेल्वेस्थानकात सुमारे १२० सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यामध्ये आणखी ३० कॅमेºयांची वाढ झाल्यास हा आकडा १५० वर जाणार आहे.ठाणे स्थानकातील सीसीटीव्हींचा सर्व्हे करण्यात आला असून त्यामध्ये आणखी ३० सीसीटीव्हींची गरज असल्याने तशी मागणी केली आहे. भविष्यात ठाणे स्थानकात सीसीटीव्हींची गरज वाढणार आहे.-सुरेश व्ही. नायर,डायरेक्टर, ठाणे रेल्वेस्थानक
ठाणे रेल्वेस्थानकात आणखी ३० सीसीटीव्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 6:38 AM