गेल्या कित्येक वर्षांपासून कागदावरच असलेल्या ठाण्याच्या बहुचर्चित क्लस्टर योजनेचा शुभारंभ गेल्यावर्षी जून महिन्यात किसननगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला होता. सिडको ही घरे बांधत असून, आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीच सिडकोने किसननगरमध्ये आणखी ३८३३ घरे बांधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी सिडको ९१२ कोटी ५४ लाख रुपये खर्च करणार आहे.
सनराईज इमारत कोसळून १८ रहिवाशांचा बळी गेल्यानंतर ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक अनधिकृत व अधिकृत इमारतींचा सुनियोजित व संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास व्हावा, यासाठी एकूण ४५ नागरी पुनरुत्थान आराखडे ठाणे महापालिकेने तयार केले आहेत. तब्बल १५०० हेक्टर क्षेत्रावर ही योजना राबविण्यात येत आहे. इतक्या मोठ्या क्षेत्रावर राबविण्यात येणारी पुनर्वसन आणि पुनर्विकासाची ही आशिया खंडातील पहिलीच योजना आहे.
दोन टप्प्यांत १० हजारांवर घरांचे बांधकाममुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून निवडून येतात, त्यातील अत्यंत दाटीवाटीचे क्षेत्र असलेल्या किसननगर नागरी पुनरुत्थान आराखडा क्र. १२ मधील नागरी पुनरुत्थान योजना क्र. १ व २ चा शुभारंभ ६ जून २०२३ रोजी केला होता. या दोन्ही योजनांत १० हजारांवर घरांचे बांधकाम आणि परिसर विकास सिडको करणार आहे.
‘महाप्रीत’सोबत सामंजस्य करारकिसननगर परिसरापाठोपाठ ठाणे शहरातील टेकडी बंगला, हाजुरी आणि किसननगरमधील उर्वरित भागात क्लस्टर योजना राबविण्यासाठी महात्मा फुले नवीनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्राद्योगिकी मर्यादित (महाप्रीत) या शासकीय कंपनीच्या माध्यमातून येथे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ‘महाप्रीत’ने परवडणारी घरे, शहरी नियोजन, अक्षय ऊर्जा, कृषिमूल्य साखळी, पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यासाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये ठाणे महापालिकेबरोबर सामंजस्य करारही केला आहे.