कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महापालिकेच्या कोविड रुग्णालयात येत्या आठवडाभरात आणखीन १७५ आयसीयू आणि ऑक्सिजनचे ५०० बेड उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी दिली.
आठवडाभरापूर्वी महापालिकेच्या कोविड रुग्णालयात एकूण १ हजार ९३९ ऑक्सिजन बेड होते. ही क्षमता आता ५०० बेडने वाढणार आहे. आयसीयू बेड एकूण ८४९ होते. त्यात येत्या दोन दिवसात १०५ ने वाढ होणार आहे. त्यानंतर चार दिवसात ७० आयसीयू बेड आणखी उपलब्ध केले जाणार आहेत. त्यामुळे १७५ ने आयसीयू बेडची क्षमता वाढणार आहे. व्हेंटिलेटर बेडची ही कमतरता भासू नये यासाठी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे उपलब्ध असलेले ५ व्हेंटिलेटर महापालिकेच्या रुग्णालयास उपलब्ध करून घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर व्हेंटिलेटरप्रमाणे काम करणाऱ्या ५० एचएफएनओ मागविले आहेत.
महापालिकेच्या कल्याण आर्ट गॅलरी येथील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा प्लांट यापूर्वीच कार्यान्वित केला आहे. त्याचबरोबर वसंत व्हॅली येथील कोसाठाविड सेंटर य़ेते ही ऑक्सिजनचा प्लांट आहे. महापालिका कोविड रुग्णांलयासाठी पुरेसा ऑक्सिजनचा आहे. महापालिकेकडे सध्या ५० मेट्रिक टन साठा आहे. त्यामुळे कोविड रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, अशी तजवीज केली आहे.
काळा बाजार रोखण्यासाठी एफडीएचा अधिकारी
महापालिकेचे कोविड रुग्णालये आणि ५० खाजगी कोविड रुग्णालये धरून ११८ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासते आहे. खासगी कोविड रुग्णालयांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू शकतो. ऑक्सिजनच्या खासगी पुरवठादारांकडून वेळेत पुरवठा न झाल्यास तो उपलब्ध करून देणे, काळाबाजार होणार नाही याकरिता एफडीएचा पूर्ण वेळ सहाय्यक दर्जाचा अधिकारी कल्याण डोंबिवली भागासाठी तैनात केला असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
-----------------------