- सदानंद नाईक उल्हासनगर : शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी समर्थकासह पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी प्रवेश घेतला. सिंधी बहुल शहरात महापालिकेवर सर्वाधिक वर्ष सत्ता ठेवण्यात शिवसेनेला यश आले असून यापुढे शिवसेनेची सत्ता राहण्याचे संकेत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्यांनी दिली.
उल्हासनगर सिंधी बहुल शहर असलेतरी महापालिकेवर शिवसेनेची सर्वाधिक वर्ष सत्ता होती. शिवसेनेचे गणेश चौधरी, यशस्विनी नाईक, विजया निर्मल, लिलाबाई अशान, अपेक्षा पाटील, राजश्री चौधरी आदीनी महापौर भूषविले आहे. दरम्यान शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर सुरवातीला शिंदे गटाला उल्हासनगर मधून विरोध होऊन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड झाली होती. शिवसेनेचे दोन गट झाल्यावर शिंदे गटाच्या शहरप्रमुख पदी रमेश चव्हाण व राजेंद्र सिंग भुल्लर यांची नियुक्ती केली. तर ठाकरे गटाचे गेली १५ वर्ष शहरप्रमुख राहिलेले राजेंद्र चौधरी यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जमीन हडपणे, फसवणूक, खंडणी, अपहरण आदी तब्बल १९ गुन्हे एकाच गुन्हे प्रकरणात दाखल झाल्यावर, चौधरी यांनी गुन्हा होण्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी समर्थकासह पक्ष प्रवेश घेतला.
शिवसेना ठाकरे गटाने दिलीप गायकवाड व कैलास तेजी यांच्यावर शहरप्रमुख पदाची जबाबदारी दिली. शिवसेना शिंदे गटात गेलेले राजेंद्र चौधरी यांची गेल्या आठवड्यात उल्हासनगर महानगरप्रमुख पदी शिंदे गटात नियुक्ती झाली आहे. उल्हासनगर पश्चिमचे ठाकरे गटाचे शहरप्रमुख दिलीप गायकवाड, माजी नगरसेविका ज्योती गायकवाड, उपशहर संघटक आनंद सावंत यांच्यासह समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या समवेत पक्ष प्रवेश घेतला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, राजेंद्रसिंह भुल्लर आदीजन उपस्थित होते.