मुंब्रा : येथील ठाकूरपाड्यातील इमारतीपाठोपाठ आनंद कोळीवाडा परिसरातील २३ वर्षांपूर्वीची ठामपाच्या धोकादायक इमारतींच्या यादीत नसलेली एक इमारत अचानक बाजूच्या दोन इमारतींच्या दिशेने झुकल्याचे रविवारी रात्री उशिरा निदर्शनास आले. यामुळे तिन्ही इमारतींमधील ५७ कुटुंबांना त्वरित इतरत्र हलवण्यात आले आहे.१० दिवसांमध्ये मुंब्य्रातील विविध भागांतील दोन इमारती झुकल्याच्या या घटनांमुळे येथील रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. येथील आनंद कोळीवाडा परिसरात १९९४ मध्ये बांधलेली रिद्धी ही तळ अधिक पाच मजली इमारत बाजूच्या आरके तसेच कमल या इमारतींच्या दिशेने झुकल्याचे निदर्शनास आले. यामुळे येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी रिद्धीमधील २१ तसेच आरकेमधील १६ आणि कमल या इमारतीमधील १९ अशा एकूण ५७ कुटुंबांना त्यांच्या सदनिका त्वरित खाली करण्याचे निर्देश ठामपाच्या अधिकाºयांनी दिले. यातील झुकल्यामुळे राहण्यास अतिधोकादायक झालेल्या रिद्धी या इमारतीमधील २१ कुटुंबांना रूमचे भाडे भरता यावे, यासाठी ठामपा प्रत्येकी पाच हजार रु पयांची आर्थिक मदत करणार असल्याची माहिती सहायक आयुक्त शंकर पाटोळे यांनी दिली.दरम्यान, रिद्धी ही इमारत पहिल्यापासूनच बाजूच्या इमारतींना चिकटली असून कोणीतरी जाणूनबुजून इमारत झुकल्याची अफवा पसरवली. तसेच पावसाळा संपल्यानंतर तिच्या दुरु स्तीचा निर्णय इमारतींमधील रहिवाशांनी घेतला होता, अशी माहिती या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणाºया नजमा खान या महिलेने दिली. तर, दोन वर्षांपूर्वी इमारतीच्या सिलिंगचे रिपेअरिंग करण्यात आले होते. परंतु, काही रहिवाशांनी पैसे न दिल्यामुळे तिची पूर्ण दुरु स्ती करण्यात आली नव्हती, अशी माहिती अन्य एका रहिवाशाने लोकमतला दिली.
मुंब्य्रात आणखी एक इमारत झुकली, १० दिवसांतील दुसरी घटना : ५७ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 6:02 AM