ठाणे : खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या कळवा पूर्व येथील जीत महेंद्र वर्मा या १६ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत शोध घेऊनही त्या बालकाचा मृतदेह मिळून आला नव्हता. अखेर अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. पाण्याचा अंदाज न आल्याने खदानमध्ये तो बुडाल्याची शक्यता ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने वर्तविली आहे. हा प्रकार घडल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन टीमला दीड ते दोन तासांनी कळविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कळवा पूर्व येथील वृंदावन सोसायटीत राहणारा जीत हा दुपारच्या सुमारास इतर सात मित्रांसोबत कळवा, ठाकूर पाडामधील खदाणीत पोहण्यासाठी गेला होता. जीत याने दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाण्यात उडी घेतली; मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खदानमध्ये बुडाला. या घटनेची माहिती जवळपास पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास ठाणे आपत्ती विभागाला मिळाल्यावर तातडीने आपत्ती, अग्निशमन दल, टीडीआरएफ आणि कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत शोध सुरू होता. तोपर्यंत त्या बालकाचा मृतदेह मिळून आला नाही. अंधार झाल्याने अखेर शोधकार्य थांबविण्यात आल्याची माहिती ठामपा आपत्ती कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली.