ठाणे : विद्युत वाहिनीच्या धक्क्याने आणखी एका वानराचा मृत्यु झाल्याची घटना ठाण्यातील वागळे इस्टेट, रोड नंबर २८ येथील मॅक्स स्पेर लिमीटेड कंपनीसमोर रविवारी घडली. या आधीही एक आठवडयापूर्वीं विजेच्या धक्क्याने याच भागात दोन वानरांचा मृत्यू झाला होता.
रविवारी सकाळी ९.५० वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट, येथील मॅक्स स्पेर लिमीटेड कंपनी समोरील इलेक्ट्रिक पोलवर चढलेल्या एका जंगली वानराला हाई टेन्शन इलेक्ट्रिक केबलला चिकटल्याने शॉक लागला. यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली. त्यानुसार कक्षाचे कर्मचारी, वागळे इस्टेट अग्निशमन केंद्राचे कर्मचारी, महावितरण विभागांचे वायरमन आणि वनविभाग अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यानंतर त्या मृत वानराला खाली काढून वनविभागाच्या ताब्यात दिल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. याआधी ७ डिसेंबर रोजी याच ठिकाणी दोन जंगली वानराचा विद्युत वाहिनीचा शॉक लागून मृत्यू झाला होता. त्यामुळे अशा प्रकारे वानरांचे अपघाती मृत्यु होण्याने वनविभागापुढिल चिंता वाढली आहे.