ठाणे : एका सहकारी महिलेच्या विनयभंगप्रकरणी निलंबित झालेले ठाणे कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांच्यावर सरकारी नोकरावर हल्ला केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारातच त्यांनी काही कर्मचाऱ्यांना दमदाटी करून ३५ ते ४० लोकांना त्यांच्या सहा गाड्यांसहित कारागृहाच्या आवारात प्रवेश देण्यासाठी दबाव आणल्याने त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे शिपाई शरद खोत आणि त्यांचे सहकारी अजित पिसाळ हे २७ आॅक्टोबर रोजी कारागृहाबाहेरील फाटकाजवळ कर्तव्यावर होते. त्या वेळी या दोघांनाही जाधव यांनी बाजूला करून फाटकाचे गेट उघडले. त्यानंतर, ४० लोकांना वाहनांसहित आत घेतले. या वेळी त्यांनी या कर्मचाऱ्यांना दमबाजीही केल्याचा आरोप खोत यांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याने जाधव यांना अटक केली नसल्याचे ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी सांगितले. जाधव यांच्याविरुद्ध यापूर्वीच एका सहकारी महिलेच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी निलंबनाची कारवाई केलेली असतानाच त्यांच्यावर हा दुसरा गुन्हा त्याच पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)
ठाणे कारागृहाच्या निलंबित अधीक्षकाविरुद्ध आणखी एक गुन्हा
By admin | Published: October 29, 2016 2:51 AM