ठाणे : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या क्लिंटन जोसेफ स्वामी (३७, रा. मोतीलाल नगर, गोरेगाव) या आणखी एकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी रात्री अटक केली आहे. त्याला १७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
याआधी ८ जून २०१९ रोजी हितेश हेमंत मल्होत्रा (३३, दोस्तीविहार, वर्तकनगर, ठाणे) याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार, सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे आणि उपनिरीक्षक धर्मराज बांगर यांच्या पथकाने ठाण्यातील कॅडबरी कंपनीजवळ अटक केली होती. त्याच्या अंगझडतीतून दोन लाखांचा एक किलो चरस, सव्वालाखांचा एलएसडी पेपरचा अमली पदार्थ, मोबाइल आणि मोटारसायकल असा तीन लाख ८५ हजारांचा ऐवज जप्त केला होता. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोवार यांच्या पथकाने केलेल्या चौकशीतच त्याला चरसची विक्री करणाºया क्लिंटन स्वामी याचे नाव समोर आले. गेल्या तीन ते चार वर्षांपासून अमली पदार्थांची तस्करी करणाºया स्वामीला २०१४ मध्ये याच प्रकरणात गोवा पोलिसांनी अटक केली होती. तो २०१४ मध्ये जामीनावर सुटला होता. त्यानंतर गेल्या चार वर्षांपासून पुन्हा तो याच ‘उद्योगात’ अडकला होता. हितेशलाही त्यानेच अमली पदार्थांचा माल पुरविल्याची माहिती उघड झाली. त्याने कोणाच्या मदतीने ही तस्करी केली, त्याने आणखी कोणाला हा माल पुरविला, याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.