कल्याण : पावसाळा संपला तरी शहरात डेंग्यूचा प्रभाव कायम असून पत्रीपूल भागातील कृष्णानगरमध्ये राहणाऱ्या अब्दुल मैनुद्दीन सय्यद यांचा डेंग्यूच्या आजाराने रविवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.कल्याणच्या बैलबाजार परिसरात सीटमेकरचे काम करणाऱ्या सय्यद यांना पाच ते सहा दिवसांपासून ताप येत होता. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे निदान झाले. त्यात, त्यांची रविवारी प्राणज्योत मालवली. ऐन पावसाळ्यात साथीच्या आजारांचा कल्याण-डोंबिवली परिसरात प्रादुर्भाव होता. आताही आजारांचा प्रभाव कायम आहे. पावसाळा संपला तरी डेंग्यूचा प्रादुर्भाव कायम असल्याचे सय्यद यांच्या मृत्यूने समोर आले आहे. साथीच्या वाढत्या आजारांबाबत नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात या आजारांच्या जनजागृतीसाठी केडीएमसीच्या वतीने विशेष मोहीम सुरू केली होती. यात शहरातील मुख्य चौकांसह अन्य भागांमध्ये पत्रके वाटणे, गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी पथनाट्यांचे सादरीकरण करणे, अशा उपाययोजना करण्यात आल्या. परंतु, याची मात्रा लागू झाली नाही. दुसरीकडे पावसाळा संपल्यानंतरही साथीचा प्रादुर्भाव पाहता अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी बैठक घेऊन वैद्यकीय विभागांसह आरोग्य विभाग आणि अन्य विभागांवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाहीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान, याआधीही डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाले आहेत. परंतु, केडीएमसीच्या वतीने दरवेळेला नकारघंटा वाजवण्यात आली. एकीकडे जुलै-आॅगस्टमध्ये डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असताना केडीएमसीकडे मात्र डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २९ च्या आसपास होती. या वाढत्या साथीच्या आजारांवर महासभेत वारंवार लोकप्रतिनिधींकडून आवाज उठवण्यात आला. खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर निर्बंध घाला, अशा सूचनाही करण्यात आल्या होत्या. मात्र, ठोस अंमलबजावणीअभावी त्या केवळ कागदावरच राहत असल्याचे वास्तव आहे.(प्रतिनिधी)
कल्याणात डेंग्यूचा आणखी एक बळी'
By admin | Published: October 24, 2016 2:06 AM