लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : स्वाइन फ्लूच्या रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या लक्षात घेत दिल्लीवरून मुंबई आणि पुण्यासाठी आलेल्या केंद सरकारच्या चार डॉक्टरांच्या पथकाने ठाण्यातही गुरुवारी भेट दिली. ठाण्यात आणखी एक बळी गेल्याने मृतांची संख्या दहा झाली आहे. १४५ जणांना त्याची लागण झाल्याने या पथकाने आढावा घेऊन जिल्ह्यात २०१५ च्या साथीच्या पुनरावृत्तीची भीती व्यक्त केली. ठाणे जिल्हा सामान्य व ठामपाच्या कळवा तसेच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी काय सुविधा आहेत, याची रुग्णालयात जाऊन त्यांनी पाहणी केली. तसेच आवश्यक त्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या.दिल्लीवरून आलेल्या डॉ. अशोककुमार सिंग यांच्या पथकाने आरोग्य उपसंचालक कार्यालयात शहरी आणि ग्रामीण भागांतील डॉक्टरांच्या बैठकीत हा आढावा घेतला. या वेळी उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. सोनावणे इ. उपस्थित होते. तसेच डॉ.सिंग यांच्या पथकाने ठाण्यात केलेल्या या भेटींचा विस्तृत अहवालदेखील ते केंद्र सरकारला सादर करणार असल्याचे या पथकातील डॉक्टरांनी सांगितले.
आणखी एकाचा बळी
By admin | Published: June 30, 2017 2:52 AM