भिवंडी: पोलीस कर्मचाऱ्याने २९ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर त्यास पकडण्यासाठी सापळा रचून उभ्या असलेल्या अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहताच आरोपी पोलिसाने अँटीकरप्शन अधिकाऱ्यास धक्का मारून पैशांसह पलायन केल्याची घटना भिवंडीत घडली असून याप्रकरणी लाचखोर पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलकंठ खडके असे पलायन केलेल्या लाचखोर पोलिस शिपायाचे नाव आहे.
निजामपूर पोलिस ठाण्यात कार्यरत नीलकंठ खडके यांच्याकडे असलेल्या तपासातील आरोपी विरोधात गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितली होती.या वेळी तक्रारदाराने ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती.या बाबत अधिकाऱ्यांनी १० जून रोजी पडताळणी केली. तडजोडी अंती खडके यांनी २९ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार तक्रारदार मंगळवार ११ जून रोजी लाचेची रक्कम देण्यासाठी निजामपूर पोलिस ठाण्यात आला होता.याठिकाणी आधीच अँटी करप्शन विभागाच्या पथकाने सापळा लावला होता.परंतु खडके याने पोलीस ठाण्यात पैसे न स्विकारता शासकीय दुचाकीवरून तक्रारदारास आदर्श पार्क येथे बोलावून पैसे स्वीकारले.
त्यानंतर नीलकंठ खडके माघारी पोलिस ठाण्यात आला परंतु निजामपूर पोलिस ठाण्यात अँटी करप्शन विभागाच्या पथकाला पाहताच आरोपी नीलकंठ खडके याने त्या ठिकाणहुन पळ काढला.तो पळून जातांना अँटी करप्शन विभागाच्या पथकातील पोलिस उपअधीक्षक विशाल जाधव यांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी खडके याने विशाल जाधव यांना धक्का मारून खाली पाडले व लाचेच्या रक्कमेसह त्या ठिकाणहुन पलायन केले.या प्रकरणी पोलीस शिपाई नीलकंठ खडके या विरोधात लाच स्वीकारल्यासह शासकीय कामात हस्तक्षेप केल्या प्रकरणी निजामपुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग फरार पोलिस शिपाई नीलकंठ खडके याचा शोध घेत आहेत.