ठाणे : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्याची मुभा असून दुकानांच्या वेळाही बदलल्या आहेत. त्यानुसार ठाण्यात कडक अंमलबजावणी केली जात असली तरी ठाणे परिवहनच्या बसमधून सर्वांनाच प्रवासाची मुभा दिल्याचे चित्र दिसत होते. ठाण्यातील मुख्य मार्केटमध्ये रोजच्या सारखी गर्दी नसली तरी नागरिक थोड्या बहुत प्रमाणात खरेदीसाठी दिसत होते. तर पोलीस देखील ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून तपासणी करीत होते. विशेष म्हणजे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पकडून त्यांची ॲंटीजेन चाचणी जांभळी नाक्यावरील मार्केटमध्ये केली जात होती.
काेरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील पातलीपाडा, वाघबीळनाका, मानपाडा, कापूरबावडी, माजिवडा, कॅडबरी, नितिन कंपनी, तिनहातनाका, जांभळीनाका, कोर्टनाका आदींसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात होती. फक्त अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर पडणाऱ्या गाड्यांना रस्त्यावर येण्यास परवानगी दिली जात होती. मात्र, ठाणे परिवहनच्या बसमधून प्रवास करताना प्रवाशांचे आयकार्ड तपासणे गरजेचे असताना ते तपासले जात नव्हते. उलट आम्हाला महापालिका प्रशासनाकडून कोणतेच निर्देश नसल्याचे परिवहनचे कर्मचारी सांगत होते. त्यामुळे आम्ही बसमधून प्रवास करणाऱ्या कोणत्याच प्रवाशांना थांबवत नसल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली.
ठाण्यात रुग्णांसाठी हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन आणि अत्यावश्यक औषधांचा प्रचंड तुटवडा भासत असून दररोज अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. शहरात एवढी विदारक स्थिती असताना देखील नागरिक आणि प्रशासन मात्र बेफिकीरपणे वागत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. सामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेन, मेट्रोचा प्रवास प्रतिबंधित केल्याने चाकरमानी बससेवेकडे वळले खरे. परंतु. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडाल्याचे चित्र शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकातील सॅटिस येथे दिसले. बसस्थानकावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. बसमध्ये केवळ ५० टक्के प्रवासी क्षमतेस परवानगी असताना प्रवासी त्यात जबरदस्तीने घुसत होते. यामुळे कोरोनाचा प्रसार आणखी वेगाने होईल, यात शंकाच नाही.
विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई
ठाण्यातील जांभळीनाका भाजी मार्केटमध्ये शुक्रवारी लोकांची गर्दी होती. परंतु, तिचे गर्दीचे प्रमाण मात्र थोडे कमी झालेले दिसले. सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी असल्याने नागरिक त्याठिकाणी खरेदीसाठी जात होते. गुरुवारपासून लॉकडाऊन सुरू झाले आहे. या लॉकडाऊनमध्ये लोकांनी कोरोनाचे नियम पाळावे यासाठी पोलिसांनी भोंग्यावर लोकांना सूचना देण्याची सुरुवात केली आहे. तर विनाकरण जे फिरतात त्यांच्यावर कारवाई तर पोलीस करतच आहेत, परंतु आता अशा लोकांची ॲंटीजेन टेस्ट पोलिसांनी सुरु केली आहे. जे विनाकारण फिरताना दिसत होते, त्यांना थेट ॲंटीजेन टेस्टच्या रांगेत उभे करुन त्यांची चाचणी केली जात होती. त्यामुळे नागरिक याला देखील घाबरतांना दिसले.
आयकार्ड तपासून रेल्वे तिकीट
ब्रेक द चेन लॉकडाऊनची गुरुवारी रात्री ८ पासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार शुक्रवारी सकाळी ठाणे रेल्वेस्थानकात त्याचा परिणाम दिसून आला. रेल्वे पोलीस भोंग्यावर प्रवाशी वर्गाला सूचना देत होत होते. मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, अत्यावश्यक सेवा संबंधित काम नसेल तर विनाकारण प्रवास करू नका नाहीतर कारवाई होईल, असे आवाहन देखील पोलीस करताना दिसत होते. तर स्थानकात रस्सी बांधून प्रवाशांसाठी वेगळी मार्गिका तयार केली आहे. तिकीट खिडकीवर प्रवाशांचे आयकार्ड चेक करूनच तिकीट दिले जात होते.
वर्दळ झाली कमी
राज्य शासनाने कडक लॉकडाऊन घोषित केल्यानंतर शुक्रवारी रस्त्यावरील वर्दळ आणखी कमी झाल्याचे दिसत होते. केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच ये-जा करण्याची मुभा दिली जात होती. ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मुलुंड टोलनाका याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात होती. तसेच विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई देखील केली जात होती. एकूणच नागरिक देखील या लॉकडाऊनला आता कुठेतरी प्रतिसाद देत असल्याचे चित्र दिसून आले.