ठाणे : शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गणेश विसर्जनाला येणाऱ्या भाविकांची अँटिजन चाचणी करण्याची व्यवस्था ठाणे महापालिकेने केली असून, त्यानुसार शनिवारी २५ ठिकाणी दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी आलेल्या एक हजार १९२ भाविकांची अँटिजन चाचणी झाली. यात केवळ एकाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून यापुढेही भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रत्येक विसर्जन ठिकाणी अँटिजन चाचणी केंद्र उभारले आहे. याठिकाणी भाविकांची अँटिजन चाचणी करण्यात येत आहे. शनिवारी दीड दिवसांच्या विसर्जनासाठी आलेल्या एक हजार १९२ भाविकांची चाचणी झाली. यातील एक भाविक बाधित असल्याचे आढळले. कळवा येथे ९१ भाविकांची अँटिजन चाचणी झाली. रेवाळे तलाव ५३, खारेगाव खाडी ४०, फडकेपाडा खार्डी तलाव ५५, कावेसर तलाव ६१, बाळकूम घाट ३७, रेतीबंदर पारिसक ५५, दातीवली तलाव १०, रेवाळे तलाव १०, गायमुख ३७, रेतीबंदर मुंब्रा ९७, विटावाखाडी ३०, गणेश घाट पाच, खिडकाळी तलाव २९, शंकर मंदिर ४५, शिवाजीनगर तलाव ६५, मासुंदा तलाव ७०, आंबेघोसाळे ४२, पायलादेवी १०६, मासुंदा तलाव ५२, कोपरी ५९, पायलादेवी ९१, कळवा खाडी २७ आणि उपवनमध्ये १० भाविकांची अँटिजन चाचणी केल्याची माहिती पालिकेने दिली.