ठाणे : सामान्य जनतेनेही समाज कार्यात आरला खारीचा वाटा उचलावा. यासाठी दोन तास समाजासाठी अशी अनुलोमची योजना आहे. अनुलोम ही संस्था समाजात सर्व घटकांचा सहभाग वाढवण्याचे काम करत नाही तर एकूणच सकारात्मकता वाढवते असे प्रतिपादन अनुलोमचे कोकण विभाग प्रमुख सदाशिव चव्हाण यांनी केले. अत्रे कट्ट्यावर अनुलोम - एक सामाजिक चळवळ या विषयावर चव्हाण यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला.
ते म्हणाले, या संस्थेची स्थापना २०१६ मध्ये १५ व्यावसायिकांना घेऊन केली. सरकारच्या कल्याणकारी योजना सामान्यांपर्यंत पोहोचविणे, त्यांच्यातील उदासीनता कमी करुन लोकसहभाग विकासकार्यासाठी मिळवणे, तरुणांमध्ये सामाजिक कार्याची प्रेरणा जागवणे या तीन उद्देशांवर काम करायचे ठरवले. हळूहळू या संस्थेशी ३५० कार्यकर्ते जोडले गेले हे सांगताना संस्थेचे विस्तारत गेलेल्या कामांची माहिती त्यांनी दिली. अनुलोमने सुरूवातीलाच ठरवले होते की राज्य सरकारच्या योजना एकूण १६०० कर्मचाऱ्यांमार्फत राबवल्या जातात त्यांच्याशी मैत्री करण्याची आणि विश्वास दाखवण्याची गरज आहे, जेणेकरुन ते त्यांच्यातील नकारत्मकता सोजून पूर्ण सहकार्य करतील. आज चार वर्षांत अनुलोमची किमान १२०० कर्मचाऱ्यांशी मैत्री आहे. प्रत्येक कामात लोकसहभाग मिळवायचा तरच लोकांना ते विकासकार्य आपले वाटते, अनुलोमने आपल्या संघटनात्मक कौशल्यातून अनेक योजना राबवून घेतल्या हे सांगताना त्यांनी काही उदाहरणे विशद केली. अंदाजे पाच लाख लोकांना आजवर म्हणजे गेल्या चार वर्षांत संस्थेने योजनांचा लाभ मिळवून दिला. ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्णांसाठी केलेले काम त्यापैकी एक आहे. त्याशिवाय छोट्या सामाजिक संस्थांना विविध प्रकारे मदत अनुलोमने आपल्या विकास मेळाव्यांतून मिळवून दिली आहे.