लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये रोज कोरोना रुग्ण व मृत्यूचे आकडे पाहून चिंता वाढली असून गेल्या 8 दिवसात कोरोनाचे तब्बल 561 रुग्ण सापडले आहेत . गुरुवारी सर्वात जास्त 145 नवे रुग्ण सापडले . तर गेल्या अडीच महिन्यात कोरोना मुळे एकूण 71 जणांचा मृत्यू झाला असला यातील निम्म्या पेक्षा जास्त तब्बल 38 जणांचा मृत्यू गेल्या 8 दिवसात झाला आहे .
मीरा भाईंदरमध्ये हल्ली कोरोनाचे रोजचे येणारे आकडे व कोरोनाचे बळी पाहून चिंतेचे वातावरण आहे . आज काय आकडा येतो याची चिंता आणि धास्ती बहुतांश लोकांना वाटू लागली आहे . 27 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता . तर 7 एप्रिल रोजी कोरोनाने शहरातला पहिला बळी घेतला होता . 11 जून पर्यंत शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1338 इतकी झाली असली तरी यातील 699 रुग्ण बरे झालेले आहेत . सध्या 568 कोरोना रुग्ण एक्टीव्ह आहेत . आता पर्यंत कोरोना मुळे 71 जणांचा मृत्यू झालेला आहे .
परंतु 3 जून ते 11 जून या अवघ्या 8 दिवसांच्या काळातच कोरोनाचे तब्बल 561 नवे रुग्ण सापडले आहेत तर 38 जणांचा या काळात मृत्यू झाला आहे . 3 जून रोजी सर्वात जास्त 8 जणांचा मृत्यू झाला . तर 11 जून रोजी सर्वात जास्त 145 इतके कोरोना रुग्ण आढळून आले . कोरोनाचे रोजचे आकडे वाढते आहेतच पण मृत्यूचे प्रमाण देखील 6 टक्क्यांच्या घरात पोहचले आहे . त्यामुळे लॉक डाऊन शिथिल केले असताना अनेकां कडून सुरक्षेचे नियम व निर्देश पाळले जात नसल्याने स्थिती बिकट होत चालली असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे .
केस पाहून कळले मृतदेह चुकीचा आहे
महापालिकेच्या पंडित भीमसेन जोशी कोविड रुग्णालयात बुधवारी भाईंदर पश्चिम भागातील एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता . मृताच्या मुलास मृतदेह पूर्णपणे रॅप करून देण्यात आला . परंतु मृतदेहाच्या डोक्यावर केस होते तर मृत वडिलांच्या डोक्यावर मात्र केस नव्हते हि बाब मुलाच्या लक्षात आल्याने त्याने त्वरित कर्मचाऱ्यांना सदर मृतदेह आपल्या वडिलांचा नसल्याचे सांगितले . त्यामुळे खळबळ उडाली . नंतर पडताळणी करून मुलास वडिलांचा मृतदेह देण्यात आला . केसां मुळे वेळीच लक्षात आले अन्यथा अनर्थ झाला असता असे परिचिताने सांगितले .