ठाणे : अवघ्या दोन महिन्यांनी म्हणजे ९ नोव्हेंबरपासून तुळशी विवाहास प्रारंभ झाल्यानंतर अनेक जण विवाहबद्ध होतील. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ याप्रमाणे लग्नासारख्या मोठ्या मंगल कार्यांसाठी सोन्याची साठवणूक केली असली तरी साधारण महिना-दीडमहिना अगोदर दागिने बनवले जातात. मात्र, सोन्याचा भाव ४० हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत जाऊ लागल्याने लग्न घरांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण असून, मध्यमवर्गीयांचे बजेट पुरते कोलमडले आहे. दुसरीकडे गुंतवणूकदारांनीही चढ्या दरांमुळे सोनेखरेदीकडे पाठ फिरवली आहे.
सराफा व्यावसायिक सचिन घोडके म्हणाले की, ‘आर्थिक मंदी व सोन्याचे वाढते भाव यामुळे ग्राहकांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे. घरात लग्नसराई असलेलेच सध्या नाईलाजाने दागिने बनवत आहेत. सोन्याचा भाव यंदाच्या हंगामात ३९ हजार ५०० प्रति तोळ्यापर्यंत वाढला होता. तर, चांदीच्या भाव प्रति किलोला ७० हजारांच्या घरात पोहोचला होता. तो आता ५३ हजारांपर्यंत गडगडला आहे. चांदीचा भाव अजून वाढेल, या हेतूने काहींनी सोने विकून चांदी खरेदी केली होती. मात्र, भाव पडल्याने त्यांना फटका बसला आहे. मात्र, दरमहिन्याला अर्धा, एक ग्रॅम खरेदी करणाऱ्यांनाच सध्या दिलासा मिळाला आहे.’
गुंतवणूक क्षेत्रातील अभ्यासक अतुल कुलकर्णी म्हणाले, की ‘शेअर बाजार गडगडत असला तरी हीच खरी गुंतवणुकीची संधी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारही सोने घेणे टाळत आहेत. खरोखरच गरज असलेले, भविष्यात भाव वाढेल आणि ज्यांना भावाबाबत कल्पना नाही, असेच लोक सध्या सोने खरेदी करत आहेत.’
‘डिसेंबरमध्ये माझे लग्न होणार आहे. लग्न म्हटले की दागिने आले. परंतु, वाढत्या सोन्याच्या भावाने आम्ही गडबडून गेलो आहोत. चढ्या दरामुळे मंगल कार्य करावे का, हाच प्रश्न मध्यमवर्गीयांपुढे उभा ठाकला आहे,’ असे मंगला गोसावी यांनी सांगितले. तर, प्राजक्ता आपटे म्हणाल्या की, ‘सगळ्या गोष्टी अनिश्चित आहेत. बाजारातील ट्रेंड व आवडीनुसार दागिने बनवणे वाढत्या महागाईमुळे शक्य नाही. बजेट वाढत असल्याने त्याला कुठे तरी मुरड घालावी लागत आहे.’