कल्याण/म्हारळ - कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यावर बाराव्या गणातील मतपेटीतून धूर येऊन त्यातील मतपत्रिका जळाल्याची घटना रविवारी घडली होती. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीच्या मतमोजणीची प्रक्रिया स्थगित केली आहे. मात्र, जळालेल्या मतपत्रिकांचा गण वगळून अन्य २८ गणांमधील मतमोजणी आजच घेण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी निवडणूक अधिकाऱ्यांना घेराव घातला. मतमोजणी न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.बाजार समितीची मतमोजणी सोमवारी समितीच्या आवारात होणार होती. मात्र बाराव्या गणातील मतपेटीतील मतपत्रिका जळाल्याने मतमोजणी रद्द केली. हा आदेश आल्याचे अनेक उमेदवारांना माहीत नव्हते. त्यामुळे मतमोजणीच्या ठिकाणी मंडप उभारला होता. त्याठिकाणी उमेदवार पोहोचले होते. मतमोजणी सुरू केली जात नसल्याने उमेदवारांनी बाजार समितीचे कार्यालय गाठून सहायक निवडणूक अधिकारी श्यामकांत साळुंके यांच्याकडे धाव घेतली. अन्य २८ मतदान केंद्रांवरील मतदान शांततेत झाले आहे. तिथे कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. त्यामुळे मतमोजणी सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर साळुंके यांनी वरिष्ठांचे आदेश असून याविषयीचा निर्णय जिल्हाधिकारीच घेतील, उमेदवार व पक्षांनी केलेल्या मागण्या वरिष्ठ पातळीवर कळवल्या जातील, असे आश्वासन दिले. मतमोजणीसाठी घातलेला मंडप कोणाच्या आदेशाने गुंडाळून ठेवण्यात आला. हा अधिकाऱ्यांचाच पूर्वनियोजित कट होता, असा आरोपही उमेदवारांनी केला. उमेदवार व कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसांनी संतप्त कार्यकर्त्यांना दालनाबाहेर काढून केवळ उमेदवारांनाच आत बसू दिले.दरम्यान, शिवसेना आमदार सुभाष भोईर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांनी सहायक निवडणूक अधिकारी साळुंके यांच्याशी चर्चा केली. तसेच बाजार समितीचे प्रशासक शहाजी पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. मतपत्रिका जाळल्याची घटना घडलेली असल्याने अन्य २८ गणांतील मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणी चार दरवाजे असून ती जागा सुरक्षित नाही. त्यामुळे या मतपेट्या तेथून पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली हलवून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची मागणी केली. यावेळी बाजार समितीचे प्रशासक पाटील हे अनुपस्थित होते. ते याच प्रकरणासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण्याला गेल्याचे सांगण्यात आले.‘त्या’ गणातीलफेरमतदान २४ मार्चला?प्रशासक पाटील म्हणाले की, जिल्हाधिकाºयांनी निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावानुसार ज्या गणातील मतपत्रिका जळाल्या आहेत, त्या गणासाठी फेरमतदान प्रक्रिया २४ मार्चला घेतली जाणार आहे. त्यानंतर, सर्व गणांतील मतमोजणी २५ मार्चला केली जाईल. या प्रस्तावाबाबत निवडणूक आयोगाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत प्रशासन आहे.स्ट्राँगरूमची पाहणीशिवसेनेच्या वरिष्ठांनी उमेदवारांसह स्ट्राँग रूमची सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांच्यासह पाहणी केली. या रूमच्या शटरला एकच सील असून भिंतीच्या वरच्या भागातून घुसता येऊ शकेल, असा मोकळा भाग केवळ पुठ्ठ्याने झाकल्याचे पोवार यांच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा पोवार यांनी आजूबाजूच्या परिसरात कुणीही येऊ नये, यासाठी तेथे बॅरिकेट्स लावण्यात येतील, असे सांगितले.
एपीएमसी निवडणूक : मतपत्रिका जाळल्याने मतमोजणी स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 5:05 AM