उल्हासनगर : डोंबिवली येथील कार्यक्रमात पत्रकारांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उल्हासनगरच्या कार्यक्रमात माफी मागून संबंधीतावर कारवाईचे आदेश दिले. यावेळी त्यांनी पक्षाच्या ३ हजार बूथ वारीयर्सना टॉउन हॉल मध्ये मार्गदर्शन केले.
उल्हासनगरातील टॉउन हॉल मध्ये उल्हासनगर, कल्याण पूर्व व अंबरनाथ अश्या ३ विधानसभा क्षेत्रातील पक्ष बूथ वारीयर्स सोबत थेट संवाद साधून मार्गदर्शन केले. यावेळी केबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, कुमार आयलानी, शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, प्रकाश माखिजा आदीजन उपस्थित होते. डोंबिवली येथील कार्यक्रमात पत्रकारांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध शहारातील पत्रकारांनी काळ्या फिती बांधून केला. टॉउन हॉल येथील कार्यक्रम संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना पत्रकारांना झालेल्या धक्काबुक्की बाबत स्थानिक पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी माफी मागून संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिले. टॉउन हॉल मधील बूथ वारीयर्सच्या कार्यक्रमात ओळखपत्र तपासूनच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जाऊ दिले जात होते.
शहरातील टॉउन हॉल मधील कार्यक्रमानंतर भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या कॅम्प नं-१ मधील भाजी मार्केट ते जुना बस स्टॉप दरम्यान नागरिक, दुकानदार, फेरीवाले यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी संवाद साधून पंतप्रधान मोदी बाबत प्रतिक्रिया विचारल्या. तसेच जुना बस स्टॉप येथे सभा घेऊन पंतप्रधान मोदी यांच्या कामाची माहिती नागरिकांना दिली. भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या कार्यक्रमाला एनडीएचे मित्रपक्ष असलेले शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार गटाचे कोणतेही पदाधिकारी व कार्यकर्ते फिरकले नाहीत