भाग्यश्री प्रधान, ठाणेडोंबिवली शहर ही सांस्कृतिक कार्यक्रमाची उपराजधानी. मात्र येथील सांस्कृतिक कार्यक्रम कधी, कुठे व केव्हा होईल, याची माहिती रसिक श्रोत्यांना घरबसल्या मोबाइल अँड्रॉइड अॅप्सद्वारे मोफत मिळणार आहे. डोंबिवलीच्या आदित्यने विचारे यांनी शो सीटी या नावाचा अॅप तयार करून सामाजिक व सांस्कृतिक चळवळ जिल्ह्यात आणखी जोमाने सुरू राहावी, यासाठी पुढाकार घेतला आहे.आदित्यने बी.ई. मेकॅनिकल इंजिनीअरिंग पूर्ण केले आहे. त्यानंतर, आयटी क्षेत्रात काम करताना आपण समाजास काहीतरी देणे लागतो, असा विचार करून नोकरी सोडून पूर्णवेळ उद्योग करण्याचा निर्णय घेतला. स्वत:ची इव्हेंट कंपनी त्याने स्थापन केली आणि याचदरम्यान त्याला लक्षात आले की, नागरिकांपर्यंत काही चांगले सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पोहोचत नाहीत आणि त्या कार्यक्रमांना अतिशय कमी गर्दी होते. हे लक्षात येताच त्याने शो सीटी नावाचा अॅप तयार करण्याचे ठरविले. या अॅपचे १६ आॅगस्टला त्याने उद्घाटन केले. मात्र, त्यानंतरही या अॅपमध्ये सुधारणा करण्यासाठी या अॅपचे पुढचे व्हर्जन तो तयार करत आहे. एम इंडिकेटर या अॅपमध्ये दोन ते तीन महिन्यांनी सतत सुधारणा होते. त्याच्या सूचनाही अॅपतर्फे आपल्याला कळवल्या जातात. त्याचप्रमाणे शो सीटी अॅपमध्ये सुधारणा झाली की, मोबाइलद्वारे आपल्याला सूचना मिळतील, असेही त्याने नमूद केले. अॅपचे हे नवीन व्हर्जन जानेवारीपर्यंत लोकांच्या भेटीला येणार आहे. यामुळे सर्व कार्यक्रमांना न्याय दिला जाईल आणि यात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच इतर कार्यक्रमांचीही माहिती मिळणार आहे. हे अॅप जरी जाहिरातीचे काम करत असले तरीही कुठलेही पैसे येथे स्वीकारले जाणार नाहीत, असे आदित्यने सांगितले. मात्र, हे कार्यक्रम अॅपमध्ये डाऊनलोड करण्यासाठी ९६१९२०२४३४ या क्रमांकावर आदित्यशी संपर्क साधावा.
अॅपमुळे कळणार कार्यक्रम
By admin | Published: December 07, 2015 1:04 AM