मीरारोड : प्लॅस्टिकला असलेली शासनाची बंदी आणि दुसरीकडे हरित मीरा-भाईंदरचा नारा देणाऱ्या महापालिका व नगरसेवकांनी चक्क प्लॅस्टिकच्या पाने-फुले व गवताचा वापर करून नागरिकांना ‘गो ग्रीन’चा उपदेश दिला आहे. मनसेने याप्रकरणी महापालिकेस तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे .
मीरा-भाईंदर महापालिकेविरोधात पर्यावरणाचा ऱ्हास करण्याच्या तक्रारी किंवा दाखल गुन्हे हे नेहमीच चर्चेचा विषय ठरलेले आहेत. राज्यात प्लॅस्टिक पिशव्या, चमचे, ग्लास, कंटेनरला बंदी असली तरी शहरात मात्र सर्रास प्लॅस्टिक पिशव्या आदींचा वापर सुरूआहे .
दरम्यान जेसलपार्क खाडीकिनारी महापालिकेने ‘गो ग्रीन’चा नारा देऊन चक्क प्लॅस्टिक वेली-फुले आणि प्लॅस्टिक गवताचा वापर करून केलेल्या प्रकारास मनसेने विरोध दर्शविला आहे. मनसेचे शहराध्यक्ष हेमंत सावंत, शहर संघटक दिनेश कनावजे, शेखर गजरे, मनीष कामतेकर, रमाकांत माळी आदींच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. विजय राठोड, अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे आदींची भेट घेऊन नाराजी व्यक्त करून कारवाईची मागणी केली.
जेसलपार्क येथे महापालिका आणि स्थानिक नगरसेवकच्या संगनमताने हरित मीरा भाईंदरच्या पालिकेच्याच घोषवाक्याची खिल्ली उडाली आहे. प्रशासन आणि काही पर्यावरणद्रोही नगरसेवकांना पर्यावरणाशी काही देणे घेणे नसून त्याच्याआड लाखोंची उधळपट्टी मात्र केली जात आहे, असा आरोप मनसेच्या हेमंत सावंत यांनी केला. आयुक्तांनीदेखील या पुढे अशी कामे केली जाणार नाही, असे आश्वासन दिल्याचे ते म्हणाले.