पोलादपूर : ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होऊन प्रथमच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने मुसंडी मारली होती. पोलादपूरमध्ये १७ पैकी १२ जागांवर उमेदवार विजयी झाल्याने नगरपंचायत शिवसेनेने एकहाती जिंकली. निवडणुकीत काँग्रेसला ५ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेतर्फेअश्विनी गांधी यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. पोलादपूर नगरपंचायतीसाठी एकूण ७७.७१ टक्के मतदान झाले होते. प्रभागक्र मांक १५ मधून शिवसेनेच्या अश्विनी गांधी विजयी झाल्या आहेत. शिवसेनेचे १२, काँग्रेसचे ५ उमेदवार निवडून आले असल्याने पोलादपूर नगरपंचायतीच्या चाव्या शिवसेनेकडे आलेल्या आहेत. शिवसेना व काँग्रेस वगळता अन्य पक्षांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. काँग्रेसचे नेते माजी आमदार माणिक जगताप, भाजपा नेते माजी आमदार प्रवीण दरेकर, शिवसेनेचे नेते विद्यमान आमदार भरत गोगावले यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. अश्विनी गांधी यांनी या अगोदर पोलादपूर ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषविले आहे. त्यामुळे त्यांना पोलादपूरच्या समस्यांची जाण आहे. अनुभवामुळेच त्यांना नगराध्यक्षा म्हणून पहिली संधी मिळाली आहे. २५ जानेवारीला होणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून चव्हाण यांनी अर्ज भरला आहे. मात्र संख्याबळ पाहता येथे अश्विनी गांधी या नगराध्यक्ष होतील. मात्र नगरपंचायत नव्याने निर्माण झाल्यामुळे विकास आराखडा तयार करु न नियोजनबद्ध विकास करण्याचे आव्हान नवनिर्वाचित नगराध्यक्षांपुढे राहणार आहे. (वार्ताहर) राष्ट्रवादीचे आनंद यादव, सेनेचे सचिन बोंबले रिंगणातमाणगांव : येत्या २५ जानेवारीला माणगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद यादव तर शिवसेनेचे सचिन बोंबले यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे १० तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत एक असे ११ नगरसेवकांचे, पाच शिवसेनेचे तर केवळ एक नगरसेवक काँग्रेसचा आहे. परिणामी ११ नगरसेवकांच्या पाठबळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद यादव माणगाव नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष म्हणून विराजमान होणार असे येथील चित्र आहे.तळा : नव्याने निर्माण झालेल्या तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल झाले असल्याची माहिती पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार भगवान सावंत यांनी दिली. तळा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक १० जानेवारीला झाली असून १७ नगरसेवकांमध्ये १० शिवसेना, ६ राष्ट्रवादी काँग्रेस आणि १ अपक्ष असे बलाबल आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक २५ जानेवारीला होत असून नवीन नगराध्यक्षाची निवड एका विशेष सभेत करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी शिवसेनेतर्फे रेश्मा रवींद्र मुंढे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गीता बैकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून ते वैध ठरले आहेत, अशी माहिती पीठासीन अधिकारी भगवान सावंत यांनी दिली.प्रथम होणाऱ्या नगराध्यक्षपदाची माळ महिला आरक्षण असल्यामुळे पहिला नगराध्यक्ष महिलांमधील होणार आहे. आज स्पष्ट बहुमत शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेच्या रेश्मा रवींद्र मुंढे यांना विजयी होण्याची संधी १०० टक्के आहे. तर खालापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी एकमेव अर्ज शेकाप पक्षाच्या शिवानी जंगम यांचा दाखल झाला असून यामुळे निश्चित त्यांनाच नगराध्यक्षपद मिळणार आहे.
नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल
By admin | Published: January 22, 2016 2:11 AM