ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लाेकसभा मतदारसंघांत ६५ लाख एक हजार ६७१ मतदारांची नाेंद आजपर्यंत झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाकरिता २० मे राेजी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात हाेणाऱ्या निवडणुकीकरिता उमेदवारांना २६ एप्रिल ते ३ मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याचे ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांनी सोमवारी स्पष्ट केले.
आचारसंहिता लागू होऊन जेमतेम दोन दिवस झाले असताना जिल्ह्याभरातून तीन तक्रारी दाखल झाल्या. त्यांचे अवघ्या २४ मिनिटात निराकरण केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात आजपर्यंत ३५ लाख सहा हजार ८२ पुरुष मतदार व २९ लाख ९४ हजार ३१५ महिला मतदारांची नोंदणी झाली आहे. इतर मतदार एक हजार २७४ आहेत. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी ओवळा माजीवडा विधानसभेत सर्वाधिक चार लाख ९२ हजार ३८१ मतदार असून, सर्वांत कमी दाेन लाख ५२ हजार ४४० मतदार उल्हासनगरमध्ये आहेत.
जिल्ह्यात सहा हजार ५२४ मतदान केंद्रांवर मतदान करता येणार आहे. मतदान केंद्रांपैकी २२ केंद्रांवर सर्व महिला अधिकारी, कर्मचारी, पाेलिस कामकाज करणार आहेत. १८ मतदान केंद्रे दिव्यांगांसाठी असून, प्रत्येक विधानसभेत एक दिव्यांग मतदान केंद्र आहे. एक मतदान केंद्र युवकांसाठी यंदा प्रथमच असेल. जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली असून, यामध्ये भिवंडीतील वारेट, शहापूरमधील दापूर, फुगाळे, भिवंडी पूर्वेतील शांतीनगर येथील दाेन मतदान केंद्रे आणि ऐराेलीमधील महापे यांचा समावेश आहे. या सहा केंद्रांवर मागील निवडणुकीत सर्वांत कमी मतदान झाल्याने व मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे संवेदनशील घाेषित केल्याचे शिनगारे यांनी सांगितले.
ईव्हीएम मशीन
- जिल्ह्यातील मतदानासाठी १५ हजार ८२६ ईव्हीएम मशीन आहेत. आवश्यकतेपेक्षा २४० टक्के जास्त मशीन्स असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कंट्रोल युनिट सात हजार ९१० असून, व्हीव्हीपॅट आठ हजार ५७० आहेत. तुर्भे येथील गाेडाउनमध्ये ईव्हीएम ठेवली आहेत.
या निवडणुकीला विविध ॲप -
- ‘सी-व्हिजील’ ॲपद्वारे अनियमिततेची तक्रार करता येते. तक्रार करणाऱ्यांचे नाव जाहीर हाेत नाही.
केवायसी -
- या ॲप्लिकेशनद्वारे उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी, मालमत्ता आदी माहिती नागरिकांना उपलब्ध हाेते.
व्हीएचए - या ॲप्लिकेशन मतदार यादीतील मतदाराचे नाव शाेधणे, नाेंदणी अर्ज दाखल करणे, मतदान केंद्राची माहिती मिळते.
सक्शन ॲप - याद्वारे दिव्यांग व्यक्तींना चिन्हांकित करण्यासाठी हे ॲप्लिकेशन उपलब्ध झाले आहे.
सुविधा ॲप - याद्वारे उमेदवारांना निवडणूकविषयक विविध माहिती, परवानगी मिळवता येते.
ईन्काेरे ॲप -
याद्वारे उमेदवारांना ऑनलाइन नामनिर्देशनपत्र प्रतिज्ञापत्र देता येते. आलेले अर्ज स्वीकृत, अधिस्वीकृत करणे, झालेल्या मतदानाचे उमेदवारास डिजिटाईज स्वरूपात माहिती संकलित करता येते.