लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनाकाळात कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी फायर, इलेक्ट्रिक आणि ऑक्सिजन ऑडिट करण्यासाठी सरकारमान्य तज्ज्ञ समितीची नेमणूक करावी, असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (दि. २६) दिले आहेत.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घ्यावी, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली होती. शिंदे यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली. त्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व कपिल पाटील, मनसे आमदार पाटील, भाजप आमदार गणपत गायकवाड, रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी सहभागी झाले होते.
रुग्णालयांनी ५० ते ६० टक्के ऑक्सिजन शिल्लक असेल तेव्हाच पूर्वसूचना दिली पाहिजे, असे मत पालकमंत्र्यांनी मांडले. त्यावर आयुक्तांनी सांगितले की, क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल करून घेतल्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो. रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजन पुरवठ्याचे नियमन करण्यासाठी भरारी पथके नेमली आहेत. महापालिकेस ३० हजार ‘रेमडेसिविर’ हवीत, अशी मागणी पुरवठादारांकडे केली आहे. कोटा रिलीज होताच इंजेक्शनची समस्या सुटू शकेल.
प्रत्येक रुग्णाच्या स्थितीची माहिती त्याच्या नातेवाइकांना दिली गेली पाहिजे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. त्यावर महापालिकेच्या कोविड रुग्णालयात हेल्पडेस्क तयार केले असून, त्याद्वारे रुग्णाची माहिती त्यांच्या नातेवाइकास दिली जाते, असे आयुक्तांनी सांगितले. रुग्णास बेड मिळत नाही. त्या काळात त्याची ऑक्सिजन पातळी कमी होते. अशा वेळी त्याला ऑक्सिजन उपलब्ध करून दिला पाहिजे, अशी सूचना खासदार शिंदे यांनी केली. त्यासाठी महापालिकांनी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी करावी. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून त्यासाठी खर्च करता येऊ शकतो, अशी माहिती नार्वेकर यांनी दिली.
मुरबाड, शहापूर, आदी भागांतही ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्याची मागणी खासदार पाटील यांनी केली. कल्याण पूर्वेतील कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी ऑक्सिजन प्लँट उभारायला आमदार निधीतून एक कोटी रुपये दिले असल्याचे आ. गायकवाड यांनी सांगितले. इतर राज्यांतून स्थलांतरित होत असलेल्यांमुळे ग्रामीण भागात कोरोना वाढत असल्याचा मुद्दा आमदार पाटील यांनी मांडला.
लसीकरणासाठी दहा केंद्रे
दि. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यासाठी केडीएमसीच्या १० प्रभागांत १० केंद्रांची व्यवस्था केली आहे. दररोज प्रती केंद्रांवर ५०० नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे. नवीन केंद्रांसाठी एसओपी तयार केली आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
-------------