कल्याण : केडीएमसी हद्दीतील २६ कोविड रुग्णालयांतील बेडची उपलब्धता तसेच सरकारी दरानुसार बिलाची आकारणी केली जाते की नाही, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाने पुन्हा ऑडिटरच्या नियुक्त्या केल्या आहेत.
मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर मनपाकडे आरोग्य यंत्रणा अपुरी होती. त्यामुळे मनपाने २६ खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली होती. मात्र, या रुग्णालयांच्या बिलांबाबत आणि अन्य प्रकरणी अनेक तक्रारी मनपास प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाने ऑडिटर नेमले होते. या ऑडिटरकरवी शहानिशा करून ७५ लाखांपेक्षा जास्त आकारलेल्या बिलांची रक्कम रुग्णालयांकडून वसूल करून रुग्णांना परत केली होती.
कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव कमी झाल्याने फेब्रुवारी २०२१ मध्ये ऑडिटरच्या नियुक्त्या प्रशासनाने रद्द केल्या होत्या. आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हे पाहता मनपाने जास्तीतजास्त बेड उपलब्ध करण्याची तयारी सुरू केली आहे. पुन्हा २६ खाजगी रुग्णालयांत कोविडवर उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे तेथे ऑडिटर नियुक्त केले असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.
---------------