- राजू काळेभार्इंदर : गेल्या दीड वर्षापासून रेंगाळलेल्या दहिसर ते भार्इंदर मेट्रो प्रकल्पासाठी सल्लागाराची अखेर नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी ३ आॅगस्ट रोजी एमएमआरडीएने आढावा बैठक घेतली. त्यानुसार, मेट्रोच्या प्रस्तावित मार्गात नऊऐवजी ११ स्थानके नियोजित केल्याची माहितीही सूत्रांनी दिली.मीरा-भार्इंदर महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराचा मेट्रोत समावेश करण्याचे निर्देश एमएमआरडीएचे तत्कालीन आयुक्त यू.पी.एस. मदान यांना दिले होते. डिसेंबर २०१७ मध्ये तत्कालीन आयुक्तांच्या नेतृत्वाखालील पथकाने या मार्गाची पूर्वपाहणी करून मेट्रोमार्गातील स्थानके आणि कारशेडच्या जागांचा आढावा पालिका अधिकाऱ्यांकडून घेतला. त्यानंतर, या मार्गातील प्रस्तावित नऊ स्थानकांना नावे सुचवण्याचे पत्र एमएमआरडीएने पालिकेला पाठवले. त्यावर, ८ डिसेंबर २०१७ रोजीच्या बैठकीत नऊ मेट्रो स्थानकांच्या नावांचा ठराव भाजपाने बहुमताने मंजूर करून एमएमआरडीएला पाठवला. त्यात राष्टÑीय महामार्ग क्रमांक-८ वर पेणकरपाडा आणि मीरागाव, काशिमीरा वाहतूक बेटालगतच्या स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज, मीरा रोडच्या साईबाबानगर परिसरातील स्थानकाला सरदार वल्लभभाई पटेल, दीपक हॉस्पिटल येथील स्थानकाला नानासाहेब धर्माधिकारी, स्व. गोपीनाथ मुंडे क्रीडासंकुल परिसरातील स्थानकाला महाराणा प्रताप सिंह, इंद्रलोक येथील स्थानकाला नवघर, भार्इंदर पश्चिमेच्या मॅक्सस मॉल परिसरातील स्थानकाला महावीर स्वामी आणि नेताजी सुभाषचंद्र मैदान परिसरातील स्थानकाला सदानंद महाराज नाव, असे मेट्रो स्थानकांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. काही स्थानकांच्या नावाला काँग्रेस व शिवसेनेचा विरोध असून तो यंदा मावळण्याची शक्यता आहे. एमएमआरडीएने या मार्गादरम्यान नऊऐवजी एकूण ११ स्थानके प्रस्तावित केल्याने उर्वरित दोन स्थानकांच्या नावांचा ठराव येत्या महासभेत मंजूर होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प चारकोप ते दहिसर मेट्रो प्रकल्प टप्पा क्रमांक-७ मध्ये न घेता तो स्वतंत्रपणे टप्पा क्रमांक-९ नुसार राबवण्यात येणार आहे.>सप्टेंबरनंतर होणार निविदा प्रक्रिया सुरूया प्रकल्पाला मान्यता मिळून दीड वर्ष उलटल्यानंतरही निविदा प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्याने आ. नरेंद्र मेहता यांनी एमएमआरडीएला पत्र पाठवून मेट्रोच्या प्रकल्पाबाबत विचारणा केली. ३ आॅगस्ट रोजी एमएमआरडीएने बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत दहिसर चेकनाका ते भार्इंदरदरम्यानच्या प्रस्तावित मेट्रो प्रकल्पासाठी जनरल कन्सल्टंट कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली असून पुढील प्रक्रिया सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. त्यानंतर, निविदा प्रक्रिया सुरु होणार असल्याचे आ. मेहतांनी सांगितले.
दहिसर ते भार्इंदर मेट्रोसाठी सल्लागाराची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 3:09 AM