मीरा रोड - मीरा भाईंदर भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक रवी व्यास यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली आहे. माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात आघाडी उभारण्यात व्यास यांचा पुढाकार मोठा असून जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती मेहता गटाला धक्का मानला जात आहे. नगरसेवक रवी व्यास यांची भाजपाच्या मीरा भाईंदर जिल्हाध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवार २१ जून रोजीच्या पत्रान्वये नियुक्ती केली आहे. व्यास यांच्यामागे तरुण कार्यकर्त्यांची फळी चांगली आहे . शिवाय महापालिका व पक्ष संघटनेत त्यांना कामाचा अनुभव आहे.
मावळते जिल्हाध्यक्ष हेमंत मात्रे हे प्रकृतीच्या कारणाने हल्ली सक्रिय नव्हते. तर दुसरीकडे माजी आमदार नरेंद्र मेहता व त्यांचे समर्थक म्हात्रे यांना जिल्हाध्यक्ष मानत नव्हते. विधानसभा निवडणुकीतील भाजपाचा पराभव मेहतांच्या वादग्रस्त प्रतिमेमुळे झाला. शिवाय त्यांची व्हायरल झालेली अश्लील व्हिडीओ क्लिप, बलात्काराचा गुन्हा तसेच अन्य अनेक गुन्हे, अनेक तक्रारींमुळे मेहता सतत वादाच्या भोवऱ्यात राहिले. त्यातूनच भाजपच्या व शहराच्या हितासाठी मेहता यांचा महापालिका आणि पक्षातील हस्तक्षेप थांबवण्यासाठी रवी व्याससह काही भाजपा नगरसेवकांनी आघाडी उघडलेली आहे.
मेहता यांच्या विरोधात नगरसेवकांचा एक गट आक्रमक असून त्यात रवी व्यास आघाडीवर आहेत. व्यास यांना जिल्हाध्यक्ष पद मिळाल्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष पद मिळवण्यासाठी मेहता गटाचे चाललेले प्रयत्न फोल ठरल्याचे मानले जाते. मेहता व समर्थकांना मिळालेला हा धक्का मानला जात आहे. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणूका होणार असून व्यास यांना जिल्हाध्यक्ष पद दिल्याने भाजपाची विस्कळीत झालेली संघटना पुन्हा बांधण्या सह पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवत पालिकेतील सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान व्यास यांच्यासमोर आहे.