मुरबाड : अंबरनाथहून पळून मुरबाडच्या दिशेने पलायन करणाऱ्या टोळक्याला मुरबाडमध्ये नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतल्यामुळे कोकण विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते व ठाणे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी मुरबाड पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे, सहायक फौजदार रशिद तडवी, सहायक फौजदार अरुण सांवत व विजय गांजाळे यांच्या कामगिरीचे कौतुक करुन त्यांना विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
२८ आक्टोबर २०२० रोजी अंबरनाथमध्ये एका टोळक्याने एका तरुणाची हत्या करून ते एका गाडीतून मुरबाडच्या दिशेने पसार होत असल्याचा फोन मुरबाड पोलीस ठाण्यात आला. पोलीस निरीक्षक बोराटे यांच्या आदेशानुसार पोलीस कर्मचारी तडवी,गांजाळे व सावंत यांनी मुरबाडच्या तीनहात नाका येथे तात्काळ नाकाबंदी केली. काही वेळाने ती गाडी आली असता त्यांनी तिला अडविले. बसलेल्यांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही अंबरनाथहून नगरला जात आहोत. विनायक पिल्ले, विजय दासी, राजू दासी, अत्तार खान अशी त्यांची नावे आहेत. गाडीची तपासणी केली असता सीटच्याखाली एक चाॅपर व मोटारसायकलचा शॉकऑबझव्हर सापडला. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, अंबरनाथमध्ये आम्ही ग्रीलचे काम करत आहोत. ग्रामस्थांनी आमच्याशी भांडण केले म्हणून त्यांनी आमच्यासोबत मारामारी केली आणि ते आम्हाला मारतील म्हणून आम्ही लपण्यासाठी नगरला जात आहोत. पुढील चौकशी केली असता त्यांनी अंबरनाथ येथे एकाची हत्या करून पलायन करत असल्याचे निष्पन्न झाले. या कामगिरीची कोकण विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक मोहिते व ठाणे पोलीस अधीक्षक देशमाने यांनी दखल घेऊन सन्मानित केले.