कल्याण : कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण स्टेशन परिसराच्या विकासकामासाठी आलेल्या निविदेचा विषय सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत तूर्तास स्थगित ठेवण्यात आला आहे. यावर, पुढील बैठकीत चर्चा होणार आहे. मात्र, कल्याण पूर्वेतील लोकग्राम पादचारी पुलाच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच कल्याण पश्चिमेतील काळातलावच्या सुशोभीकरणाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास (डीपीआर) मंजुरी देण्यात आली आहे.कल्याण-डोंबिवलीतील पादचारी आणि रेल्वे उड्डाणपुलांची कामे विचारात घेतल्यास कल्याणमधील पत्रीपुलाचे काम सुरू आहे. ते मार्च २०२० मध्ये पूर्ण होणार आहे. डोंबिवलीतील कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल दुरुस्तीसाठी बंद आहे. त्याच्या दुरुस्तीचे प्रकरण पुढे सरकलेले नाही. त्यात लोकग्राम पादचारी पुलाचीही भर पडली. कल्याण रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक सात ते लोकग्रामकडे जाणारा पादचारी पूल धोकादायक झाल्याने तो बंद करण्यात आला. या पुलाच्या पुनर्बांधणीचा मुद्दा रेल्वेकडे आहे. या पुलाचा खर्च कोणी करायचा, या मुद्द्यावर चर्चा झाली. मात्र, पादचारी पुलाची निकड पाहता आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता हा पूल स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा विषय आज स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्यात आला होता. या पुलाच्या कामासाठी ३९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुलाच्या कामास आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पुलाचा खर्च रेल्वे आणि महापालिकेने किती करावा, याविषयी निर्णय झालेला नाही. त्यावर जो काही निर्णय घेतला जाईल, त्यानंतर त्याचा विचार केला जाईल. कल्याण पश्चिमेतील काळातलावाच्या सुशोभीकरणावर २००८ ते २०१२ कालावधीत १० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यापाठोपाठ या तलाव परिसरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात आले. आता नव्याने काळातलावाचा रिमेक करण्याचा सविस्तर अहवाल स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तयार केला आहे. हा सविस्तर अहवाल ५२ कोटी खर्चाचा आहे. मात्र, स्मार्ट सिटीच्या तलाव सुशोभीकरणाच्या यादीत तलावाच्या रिमेकवर २५ कोटींचा खर्च केला जाणार असल्याचे नमूद केले आहे. प्रकल्प अहवालास संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.प्रकल्पासाठी आलेल्या निविदेची रक्कम जास्तस्मार्ट सिटीअंतर्गत केल्या जाणाऱ्या कल्याण स्टेशन परिसर विकासाचे काम ३९४ कोटींचे आहे. त्यासाठी पहिल्या प्रयत्नात मागवलेल्या निविदेस प्रतिसाद मिळाला होता. मात्र, निविदाधारक कंपनीने ५१८ कोटींची निविदा सादर केली होती. प्रकल्पाच्या कामाची रक्कम आणि प्रत्यक्षात मिळालेली निविदा पाहता १०० कोटींची तफावत असल्याने ही निविदा रद्द केली. आता नव्याने निविदा मागविली आहे. त्यासाठी ५२२ कोटींची निविदा प्राप्त झालेली आहे.ही निविदा संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवली गेली असता कंत्राटदार कंपनीशी वाटाघाटी करून निविदेची रक्कम कमी करण्यावर भर दिला जावा. त्यानंतरच निविदा मंजूर करण्यावर विचार केला जावा, असे संचालक मंडळाचे म्हणणे होते. त्यामुळे हा विषय आधी वाटाघाटी केल्यावर पुढील बैठकीत मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे.
काळातलावाचा डीपीआर, लोकग्राम पुलास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:36 AM