मीरारोड - काशीमीरा भागातून जाणाऱ्या मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पांडुरंग वाडी व दिल्ली दरबार हॉटेल येथे महामार्ग जीव मुठीत घेऊन नागरिक ओलांडत असताना अपघात अनेकांचे जीव गेले आहेत. अखेर या दोन्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भुयारी मार्ग मंजूर केले आहेत.
महामार्गावरून भरधाव वेगाने वाहने जात असल्याने पांडुरंग वाडी व लक्ष्मी बाग - दिल्ली दरबार हॉटेल दरम्यान महामार्ग ओलांडणे नेहमीच धोक्याचे झाले आहे. यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. या दोन्ही ठिकाणी पादचारी पुलाची मागणी खासदार राजन विचारे यांनी राष्ट्रीय महामार्गचे प्रकल्प संचालक यांच्याकडे २०१५ मध्ये केली होती. कामे मंजूर झाली परंतु मेट्रो कामा मुळे ती बारगळली.
अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत भुयारी मार्गाचे नियोजन करून पांडुरंग वाडी व दिल्ली दरबार हॉटेल येथे नवीन भुयारी मार्गाची कामे मंजूर झाली आहेत. या दोन भुयारी मार्गासाठी ५० कोटी खर्चास मंजुरी मिळाली आहे. महामार्गा खालून हा २२ मीटरचा भुयारी मार्ग असणार आहे. पांडुरंग वाडी येथील भुयारी मार्गाची उंची साडेपाच मीटर असेल. त्यामुळे जड अवजड वाहने सुद्धा या मार्गीकेचा वापर करू शकतील. दोन्ही बाजूस पदपथ विकसित होणार आहे. जेणेकरून त्या परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी सोय उपलब्ध होणार आहे अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली . दोन्ही भुयारी मार्गांच्या कामास मंजुरी दिल्या बद्दल खा. विचारे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत .