कल्याण : पत्री पूल धोकादायक झाल्याने तो पाडून तेथे नवा पूल उभारण्यात येत आहे. त्याला समांतर आणखीन एक तिसरा रेल्वे उड्डाणपूल उभारण्यास राज्य रस्ते विकास महामंडळाने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सहा पदरी डांबरीकरण करण्यात येणार होते. त्याऐवजी हा रस्ता सहा पदरी काँक्रिटीकरणाचा करण्यात येणार आहे. याशिवाय या रस्त्यावरील मानपाडा आणि काटई जंक्शन येथे उड्डाणपुलाच्या कामास मंजुरी दिली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.पहिल्या टप्प्यासाठी ७७८ कोटी १९ लाख रुपये खर्चाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. पत्री पुलानजीक तिसरा पूल आणि रस्त्याचे सहा पदरी काँक्रिटीकरण या दोन्ही कामांसाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. जुना पत्री पूल पाडून तेथे दुसरा नवा पत्री पूल उभारण्याचे काम फेब्रुवारी २०२० मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तिसºया पुलाचे काम १८ महिने आणि काँक्रिटीकरणाचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. तिसºया पत्री पुलाची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली होती. सार्वजनिक बांधकाममंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य रस्तेविकास महामंडळाच्या संचालकांची बैठक मंगळवारी पार पडली. सध्या पत्री पुलाचे काम सुरू आहे. अस्तित्वात असलेला पूल, नव्याने उभारण्यात येणारा पत्री पूल हे दोन्ही पूल दुपरी असल्याने पुन्हा तेथे वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवू शकतो. मुळात भिवंडी-कल्याण-शीळ या रस्त्याचे सहा पदरीकरण करण्यात येणार असल्याने त्याला पूलही सहा पदरी असावेत. मात्र, रेल्वेकडून रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलांना दुपरीची परवानगी मिळते. तिसºया पत्री पुलासाठी ५४ कोटी ३४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.अस्तित्वात असलेला पूल, दुसरा नव्याने उभा राहत असलेला पूल आणि तिसरा पूल असे तीन पूल सहा पदरी ठरणार आहेत. सहा पदरी सिमेंट काँक्रिटीकरणाच्या भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यासाठी ५४३ कोटी सहा लाख रुपये खर्च होणार आहे. पहिल्या टप्प्यातील १८३ कोटी खर्चाची कामे प्रगतिपथावर आहेत.>उड्डाणपुलांसाठी १९४ कोटींचा खर्च : भिवंडी-कल्याण-शीळ या दुसºया टप्प्यात मानपाडा, काटई, सोनारपाडा येथे उड्डाणपूल उभारला जाणार आहे. याशिवाय कल्याण-शीळ रोडवरील सुयोग हॉटेल ते पेंढरकर कॉलेज उड्डाणपूल बांधण्यासाठी १९४ कोटी ४७ लाख रुपये खर्चास मंजुरी दिली आहे.
पत्री पुलाजवळ तिसऱ्या उड्डाणपुलास मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 12:35 AM