ठाणे : ठाणे शहरातील ७२ रुग्णालयांना लसीकरणाकरिता परवानगी दिल्याची माहिती भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिली. ८५ रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु, त्या निर्णयाला दोन दिवसांत स्थगिती देण्यात आली होती. फेरसर्वेक्षणानंतर आता परवानगी दिली आहे.
लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि या मोहिमेत सुसूत्रता आणण्यासाठी ठाणे महापालिकेने काही दिवसांपूर्वी लसीकरणाचे धोरण जाहीर केले. ८५ खाजगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिली. त्याच दिवशी सोशल मीडियावर यादी व्हायरल झाली. मात्र, पालिकेने या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली होती. काही ठिकाणी जागा नसतानाही लसीकरणाला परवानगी दिली होती. इमारतीमधील घरांत असलेल्या क्लिनिकला परवानगी दिल्याचे विक्रांत चव्हाण यांनी निदर्शनास आणले होते. आयुक्त डॉ. विपिन शर्मा आणि अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन इस्पितळांच्या यादीतील त्रुटी निदर्शनास आणली. आता ७२ रुग्णालयांना परवानगी दिल्याची माहिती आ. केळकर यांनी दिली. गुरुवारी केळकर यांनी भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांच्यासमवेत आयुक्त डॉ. शर्मा यांची भेट घेतली.
........
१०० टक्के नालेसफाई झाल्यावरच बिल अदा करा
ठाण्यात नालेसफाईच्या नावाखाली दरवर्षी धूळफेक केली जाते. यंदा नालेसफाई न होता पैसे देता कामा नये, नालेसफाई न करता बिले घेणाऱ्यांवर व देणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण झाली पाहिजे, अशी विनंती केळकर यांनी केली.
.........
ग्लोबल हॉस्पिटलमधील ठेकेदाराचा ठेका रद्द करा
ग्लोबल हॉस्पिटलमधील ठेकेदाराकडून योग्य पद्धतीने काम सुरू नाही. नर्सचा पगार थकविला जात आहे. किमान वेतन कायद्यानुसार पगार दिला जात नाही. कामगारांना वेळेवर पगार मिळत नाही. जेवणाच्या तक्रारी आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णांची माहिती मिळत नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केळकर यांनी केली.
............
वाचली