ठाणे - क्रिकेट सट्टा प्रकरणातील आरोपी सोनू जालानने पैसे उकळण्यासाठी अभिनेता अरबाज खानला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांना संशय आहे. ठाणे न्यायालयाने बुधवारी त्याची पोलीस कोठडी रविवारपर्यंत वाढवली.क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळणाऱ्या टोळीची माहिती ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी मिळाली होती. त्यानुसार, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि विकास घोडके यांच्या पथकाने आतापर्यंत टोळीतील आठ आरोपींना अटक केली. क्रिकेटवर जगभरातून सट्टा घेणारा आंतरराष्ट्रीय बुकी सोनू जालान यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सोनू जालानचे बॉलिवूड जगताशी असलेले संबंध तपासादरम्यान उघडकीस आले. अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खान याचीही खंडणीविरोधी पथकाने चौकशी केली. अरबाज खान हा सोनू जालानच्या काही महत्त्वाच्या ग्राहकांपैकी एक होता. तो सोनूकडे नियमित सट्टा खेळायचा. पैशांचा हिशेब ते अधूनमधून करायचे. सट्ट्याचा हिशेब बरेच दिवसांपासून केला नसल्याने मध्यंतरी अरबाजचा सोनूशी वाद झाला. अखेर, हा विषय संपवण्यासाठी तो सोनू जालानच्या कार्यालयावर गेला. सोनने सुमारे पावणेतीन कोटी घेणे असल्याचे सांगितले. एवढी रक्कम हरलोच नसल्याचे अरबाजने त्याला सांगितले. यातून दोघांमध्ये खटके उडाले. काही दिवसांनी हा वाद मिटला. मात्र, त्या काळात सोनूच्या प्रत्येक सूचनेचे अरबाज पालन करायचा. त्यामुळे त्याला सोनूने हनी ट्रॅपमध्ये अडकवले असावे, असा पोलिसांना संशय आहे. या मुद्द्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपासही केला. मात्र, तसा पुरावा मिळाला नसल्याचे खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाºयांनी सांगितले. प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान हेदेखील सोनूकडे नियमित सट्टा लावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.आरोपींचा शोध सुरूसट्टा प्रकरणात पोलिसांकडून आणखी जवळपास ३५ आरोपींचा शोध सुरू आहे. त्यापैकी १० आरोपींची नावे उघडकीस आली आहेत. या दहापैकी दोन आरोपी ठाण्याचे तर काही आरोपी मुंबईचे आहेत. या आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी सोनू जालानची पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती बुधवारी केली. त्यानुसार, न्यायालयाने जालानची कोठडी रविवारपर्यंत वाढवली.
अरबाज खानला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 6:44 AM