भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापलिकेने शहरात बांधलेले एकमेव क्रीडा संकुल तीन वर्षांपासून अर्धवट कामामुळे खुले होऊ शकलेले नाही. सध्या ही कामे पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरू असून, त्याच्या श्रेयावरून शिवसेना व भाजपात चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकाच क्रीडा संकुलाचे तीन वेळा उद्घाटन होत असल्याची कदाचित पहिलीच घटना असावी.सध्या केवळ कॅरम, बुद्धिबळसारखे खेळ सरू झाले असले, तरी अनेकदा बंद असल्याचे खेळाडूंकडून सांगण्यात येत आहे. क्रीडा संकुल स्थानिक खेळाडूंसाठी याच महिन्यात खुले करण्याचा निर्धार राजकीय पक्षांनी व्यक्त केला आहे. हे संकुल प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत येत असून, या प्रभागात शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर व नगरसेवक तारा घरत आहेत. घरत यांनी क्रीडा संकुल खुले करण्यासाठी प्रशासनाकडे सतत पत्रव्यवहार केला होता. अखेर ते सुरू होण्याच्या मार्गावर असताना, संकुल कुणाच्या प्रयत्नाने सुरू झाले, हे मात्र वादात अडकण्याची चिन्हे आहेत. संकुलाच्या पूर्णत्वावर आमगावकर हे सतत लक्ष ठेवून असून, त्यांनी शिवसेनेच्याच प्रयत्नातून संकुल खुले करण्याचा चंग बांधला आहे. त्याच्या उद्घाटनासाठी २१ एप्रिलचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून, त्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे हजर राहाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याची कुणकुण भाजपाला लागताच, त्यांनीदेखील उद्घाटनाची तयारी चालविली आहे. त्यांचा मुहूर्त मात्र, २३ एप्रिलचा असल्याचे सांगण्यात आले. एकाच संकुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम तीन वेळा होण्याची शहरातील ही पहिलीच वेळ असून, ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर श्रेयाचे राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. उद्घाटनानंतर ते स्थानिक खेळाडूंसाठी खुले व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)तीन वर्षांपासून बंद असलेले संकुल खुले होण्यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला. त्यामुळे त्याचे उद्घाटन प्राधान्याने शिवसेनेकडूनच केले जाईल. शिवाय दुरुस्तीवर आम्हीच लक्ष ठेवून असतो. कोणतेही योगदान नसलेल्या दुसऱ्या पक्षाने श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्यास, तो सेना स्टाईलने हाणून पाडू. - हरिश्चंद्र आमगावकर, नगरसेवक.क्रीडा संकुल हे पालिकेचे आहे, ते कोणत्या पक्षाचे नाही. त्यातच शहरातील १ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीतून लोकाभिमुख विकास झाला असेल, तर त्याच्या लोकार्पणाचा अधिकार महापौरांचा आहे. त्यांनीच निश्चित केल्याप्रमाणे कार्यक्रम होणार आहे. - हेमंत म्हात्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष
क्रीडा संकुलावरून रंगणार श्रेयाचा वाद
By admin | Published: April 12, 2017 3:02 AM