ठाणे: सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या आगमन मिरवणूकीमध्ये वागळे इस्टेट हनुमाननगर भागात फटाके लावण्याच्या कारणावरुन दोन गटातील वाद उफाळून आला. त्याच दरम्यान अचानक फटाक्याचा स्फोट होऊन आनंद तिवारी (३०) या रिक्षा चालकासह पाचजण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी निष्काळजीपणे फटाके उडविणाऱ्या तसेच दगडफेक करणाऱ्या अज्ञात दहा ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी सोमवारी दिली.
हनुमाननगरातील रहिवाशी आनंद तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १५ ऑक्टाेंबर २०२३ रोजी दुर्गा देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना असल्याने देवीची मूर्ती आणण्यासाठी शिवसाई क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तसेच ५० ते ६० कार्यकर्ते सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गेले होते. मूर्ती एका लोखंडी ट्रॉलीवर ठेवून हाताने खेचून रामनगरमार्गे एमको कंपनीपासून साठेनगरकडे येत होती. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हनुमाननगर रहिवासी कमिटीच्या देवीची मिरवणूकही वागळे इस्टेट टीएमटी डेपोकडून सीएनजी पंपाकडे येत होती.
त्याचवेळी फटाके लावण्यावरुन या दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद उफाळून आला. याच दरम्यान अचानक फटाक्याचा स्फोट होऊन त्यामध्ये तिवारी यांच्या उजव्या पायाला, डाव्या हाताला आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या. याशिवाय, त्याच परिसरातील संजय पालकर (४३) , दीपक रजक (१९) हे जखमी झाले. तर कार्यकर्त्यांच्या आपसातील भांडणामध्ये झालेल्या दगडफेकीत रवी सहानी (२१)यांच्या डोक्याला दगड लागून ते जखमी झाले. सर्व जखमींना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.