मीरारोड - मीरारोडच्या युएलसी योजनेतील शांती नगर वसाहतीमधील मोकळ्या जागा बळकावण्या वरून विकासक व स्वतःला जमीन मालक म्हणवणारे यांच्या राडेबाजी सुरु आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष टोळ्यांचा वापर करून जागेवर ताबा मिळवण्यासाठी गुन्हेगारी पद्धतीचा अवलंब केला जात असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मीरारोडची शांती नगर वसाहत हि शासनाच्या युएलसी योजने अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी बांधण्यात आली आहे. परंतु सदर वसाहतीच्या आरजी जागेत बेकायदा बांधकामे व अतिक्रमण झाली असताना देखील महापालिका मात्र युएलसी विभागाची ना हरकत न घेताच नवं नवीन बांधकाम परवानग्या शांती स्टार बिल्डरला देत आहे. परंतु रहिवाश्याना मात्र अजूनही इमारत, आरजी व संकुलाच्या जमिनीची मालकी मिळाली नसून पुनर्विकास सुद्धा राखडवला जात आहे.
सदर वसाहती मधील मोकळे भूखंड आपल्या मालकीचे असल्या वरून शांती स्टार बिल्डर आणि राहुल बिल्डर , राकेश शाह यांच्यात राडेबाजी सुरु झाली आहे . मोकळ्या जागेत कुठे शांती स्टार बिल्डर तर कुठे राहुल बिल्डर , राकेश शाह यांचे फलक लागले आहेत. शांती नगर मधील सेक्टर ३ मध्ये डी / ३४ इमारतीच्या बाजूला सुमारे ७ गुंठे जमीन असून त्याठिकाणी राहुल बोल्डर , राकेश शाह आदींच्या सांगण्या वरून ४० ते ५० पुरुष व १० ते १५ महिला यांच्या टोळीने शांती स्टार बिल्डरचे कुंपण व फलक तोडले . सुरक्षा रक्षक व व्यवस्थापक उल्हास कामत यांना धमकी देत मारहाण केल्याची फिर्याद कामत यांनी दिली होती . त्यावरून नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
आता राकेश शाह यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार, शांती स्टार बिल्डरच्या सांगण्या वरून बिल्डरचे २० ते २२ महिला व ४ ते ५ पुरुष यांनी जेसीबीने कुंपण तोडून आपल्या जागेवर जाऊन कब्जा घेतला म्हणून नया नगर पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे . सदर जमिनीच्या मालकीची कागदपत्रे आपण कडे आहेत. मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल असताना शांती स्टार बिल्डर बळजबरी जमिनीचा ताबा घेऊ पाहात असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. शांती नगर वसाहत जुनी असून रहिवाश्यांचा हक्क एकीकडे मारला जात असताना वसाहती मधील करोडोंच्या मोकळ्या जमिनी बळकावण्यासाठी राडेबाजी चालू आहे.