लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना संपविण्याबाबत पालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आराेप-प्रत्याराेपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी महेश आहेर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. तर, आव्हाड यांच्या पत्नीनेही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आहेर यांनी मात्र, आराेप फेटाळले आहेत. तर आव्हाड यांनीही आहेर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
आहेर यांचा ‘तो’ व्हिडीओही व्हायरल
गँगस्टर बाबाजी ऊर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याची आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. आहेर यांची ऑडिओ क्लिप देऊनही त्यांच्याविरोधात अद्यापही गुन्हा का दाखल करण्यात आला नाही? अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ वायरल झाला असून, त्यात आहेर यांच्या कार्यालयातील कर्मचारी पैसे मोजत असल्याचे दिसत आहे.
वशिला असला की काहीही मिळविता येते मित्राचा फोन आल्यानंतर मी ते ट्वीट केले. ऑडिओत मी दिवसाला ४० लाख आणतो व २० लाख वाटतो. पालिका म्हणजे कुबेराचा खजिना आहे का? मी बाबाजीचा खास आहे, असा संवाद आहे. हा बाबाजी म्हणजे सुभाषसिंग ठाकूर आहे. तर म्हाडात १०० फ्लॅट खोट्या सह्या करून आहेरने विकले आहेत. त्याचे १२ वीचे सर्टिफिकेटही खोटे आहे. या पालिकेत वशिला असला तर कोणतेही पद भूषविता येते. डोक्यावरून पाणी गेल्यानेच हे पाऊल उचलावे लागले. हा बाबाजी कोण आहे, याची माहिती पोलिसांनी घ्यावी.- जितेंद्र आव्हाड, आमदार
ती क्लिप काय आहे, मला माहीत नाहीती क्लिप काय आहे, हे मला माहीत नाही. त्यातील आवाज माझा नाही. २०१९ पासून मी मुंब्य्राचा सहायक आयुक्त होतो, तेव्हा मी येथील बेकायदा बांधकामांवर कारवाई केली हाेती. तेव्हापासून मला मारण्याचा कट केला जात होता. काही लोकांकडून धमक्या येत होत्या. आव्हाड यांच्याशी बोलण्यास आम्ही घाबरतो. ते संभाषण टेप करून वायरल करतात. ते सांगतील तशा कारवाया करत हाेताे. मला आणि माझ्या कुटुंबाला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून धोका आहे.- महेश आहेर, सहायक आयुक्त, अतिक्रमण विभाग, ठामपा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चौघांना अटक
ठाणे पालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत वाणी, अभिजित पवार, विक्रम खामकर आणि विशंत गायकवाड या चौघांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या पथकाने गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली. ठाणे न्यायालयाने चौघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली त्यांच्याकडून हत्यार जप्त करणे, हल्ल्यामागील कारणांचा तपास व साथीदारांचाही शोध घेण्यासाठी आरोपींना सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली होती.
आव्हाडांची पोलिसांकडे तक्रार
ठाणे महापालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांनी आपल्यासह मुलगी नताशा आणि जावई ॲलन पटेल यांना ठार मारण्याची तयारी केली असल्याचा आराेप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा व भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी आव्हाड आणि त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी वर्तकनगर पोलिसांकडे केली. आव्हाडांच्या मागणीचे हे पत्र घेऊन ऋता आव्हाड व कार्यकर्त्यांनी वर्तनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सदाशिव निकम यांची भेट घेत त्यांना तक्रार अर्ज दिला.
गुन्हेगारांशी सलोख्याचे संबंध त्यांचे संघटित गुन्हेगार लोकांशी सलोख्याचे आणि व्यावहारिक संबंध आहेत. त्यामुळे आपल्यासह कुटुंबीयांना आहेर यांनी ठार करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद त्यांनी भ्रष्टाचाराच्या रकमेतून केली आहे, असे आव्हाडांनी म्हटले आहे. आव्हाड यांनी हे पत्र पोलिस महासंचालक आणि पोलिस आयुक्तांनाही दिले आहे.
या घटना चुकीच्या आहेत. याची चौकशी पूर्ण होईपर्यंत महेश आहेरला निलंबित करावे. आमच्या कुटुंबाला धमकावले गेले आहे. बाबाजी कोण आहे, हे पोलिसांनी तपासले पाहिजे. महेश आहेर हे यापूर्वीही धमक्या देत होते. मुख्यमंत्र्यांना मी हेच सांगू इच्छिते, की आता बस करा. पोलिसांना विनंती आहे की, या ऑडिओ क्लिपचा योग्य तपास करावा.- ऋता आव्हाड, ठाणे - पालघर महिला विभागाध्यक्ष, राष्ट्रवादी
ऑडिओ क्लिपमधील आवाज हा महेश आहेर यांचाच आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांची ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. आहेर यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. आव्हाड यांच्यावर वारंवार खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. पोलिसांनी याप्रकरणी योग्य न्याय करावा. - आनंद परांजपे, ठाणे शहराध्यक्ष, राष्ट्रवादी
काही अधिकारी मग्रूर, मस्तवाल झालेत
ठाणे महापालिकेत काही मग्रूर आणि मस्तवाल अधिकारी आहेत. त्यांना वाटते आपले कोणी काहीही वाकडे करू शकत नाही. त्यामुळेच हे अधिकारी माजले असल्याचा आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. शहरात बेकायदा बांधकाम होत असताना अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान महेश आहेर यांच्या ऑडिओ क्लिपबाबत विचारले असता, त्यांनाच माहीत असेल त्यांच्यातील वाद का विकोपाला गेला, असे ते म्हणाले.