ठाणे : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चौकशीसाठी पाचारण केल्याच्या पार्श्वभूमीवर अनुचित घटना घडू नये, यासाठी याआधी मनसेकडून राडा झालेल्या ठिकाणांवर पोलिसांनी गुरुवारी चोख बंदोबस्त ठेवला होता. ठाणे शहरातील भाजपच्या कार्यालयांजवळ पोलीस बंदोबस्त तैनात होता, अशी माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.खबरदारी म्हणून कलम १४९ अंतर्गत मनसेचे ठाणे- पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह २२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ठाणे शहरमधून ८४, भिवंडीतून ४४, उल्हासनगरमधून ३२, तर वागळे इस्टेट परिमंडळामधून ४२ अशा २०२ जणांना ताब्यात घेतले आहे.मनसेने आधी पुकारलेल्या बंदच्या तसेच ईडीने राज ठाकरे यांना बजावलेल्या नोटीसच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्त क्षेत्रात मनसेच्या २०२ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तर, २०४ जणांना नोटीस बजावली आहे. संवेदनशील ठिकाणांसह भाजप कार्यालयांना बंदोबस्त दिला आहे.- विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर