ठाणे: शस्त्रास्त्र तस्करी करणा-या शोएब इसाक शेख (२१) आणि रहिम शेख (३२) या दोघांना अमरावती येथून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा पिस्टल आणि ४० काडतुसे अशी सुमारे दहा लाख रुपये किंमतीची शस्त्रसामुग्री हस्तगत केल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सोमवारी दिली.डायघर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये काही महिन्यांपूर्वी भारतीय हत्यार कायद्याखाली एक गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्हयातील एक आरोपी मुकेश हा गेल्या अनेक दिवसांपासून पसार होता. याच गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक मार्फतही वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकामार्फत सुरु होता. मुकेशच्याच मागावर असलेले हे पथक अमरावती येथे गेले. तेंव्हा शोएब आणि रहिम हे अमरावतीलमधील दोघे अमरावती बस स्टँडजवळील परिसरात हॉटेल शीतल लॉजिंग अँड पंचम रेस्टॉरंट याठिकाणी मोठया प्रमाणात शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्याच माहितीच्या आधारे सापळा रचून या दोघांनाही २९ डिसेंबर २०१८ रोजी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्ये काळया रंगाच्या बॅगेतून भारतीय बनावटीचे लोखंडी आणि स्टीलचे दहा पिस्टल हस्तगत केले. तर रहिमच्या पँटच्या खिशातून ४० जिवंत काडतुसे आणि दोन मोबाईल असा सुमारे तीन लाख दहा हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही सर्व शस्त्रसामुग्री सुमारे दहा लाखांना विक्री केली जाणार होती. या दोन्ही आरोपींना ठाणे न्यायालयाने ७ जानेवारी २०१९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. मध्यप्रदेशातील एका शस्त्रास्त्र कारखान्यातून त्यांनी हे पिस्टल आणल्याचे चौकशीमध्ये पोलिसांना सांगितले. नवख्या व्यक्तींपासून ते गुन्हेगारांपर्यंत घेणाºया व्यक्तीच्या आर्थिक कुवतीनुसार २० हजारांपासून ते अगदी एक लाखांपर्यतही या शस्त्रास्त्रांची विक्री केली जात होती. शस्त्रास्त्र तस्करी करणाºया टोळीमध्ये आणखी किती जण सामील आहेल? आगामी लोकसभा निवडणूकीच्या वेळी किंवा अन्य घातपाती कारवायांसाठी त्याचा उपयोग केला जाणार होता किंवा कसे? या सर्व बाबींचा तपास केला जात असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.सरत्या वर्षात आणि नवीन वर्षांच्या आगमनापूर्वीच युनिट एकने केलेल्या या उत्कृष्ठ कामगरीबद्दल पोलीस आयुक्त फणसळकर यांनी या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. अशा प्रकारच्या बेकायदेशीर आणि समाजविघातक कारवायांचा वेळोवेळी बिमोड केला जाईल, ठाणे पोलिसांच्या उत्कृष्ठ कामगिरीमुळे सोनसाखळीचे प्रमाण अत्यल्प झाले असून चो-या आणि दरोडयांचे प्रमाणही नियंत्रित आले आहे. मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले असले तरी अशा चोरांवरही करडी नजर ठेवली जात असून हेही गुन्हे उघड करण्यात येत असल्याचे फणसळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.