ठाणे : केंद्राकडून पराज्यात अडकून पडलेल्या मजुरांना जाण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे देशभरातील सर्व राज्यांमध्ये अडकून पडलेल्यांची एकच धांदल उडाली आहे. याचा सगळ्यात मोठा भार शासनाने पोलिसांच्या खांद्यावर दिला असून पोलिसांची आणखी एका जबाबदारीने पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे. हा भार कमी व्हावा म्हणून ठाणे पोलिसांनी नगरसेवकांची मदत घेऊन परराज्यात जाणाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यान्वये काही नगरसेवकांनी परवानगीसाठी लागणारा अर्ज, वैद्यकीय प्रमाणपत्र वितरित करण्याचे काम सुरू केले आहे. केंद्राने ३ मे पर्यंत देशभरात लॉक डाऊन घोषित केला होता. तो संपण्याआधीच १ मे रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने १७ मे पर्यंत तिसºया टप्प्यातील लॉक डाऊनचा कालावधी वाढविला. मात्र यावेळी परराज्यात अडकून पडलेल्या मजूर, कामगार, विद्यार्थी आणि पर्यटकांना पुन्हा त्यांच्या राज्यात जाता यावे यासाठी केंद्राने विशेष परवानगी दिली आहे. त्यान्वये देशभरातील सगळ्या राज्यात हे काम सुरू झाले आहे. परराज्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी, पर्यटक ठिकठिकाणी अडकून पडल्याने त्यांचे हाल होत आहेत. ठाणे महानगर पालिकेच्या क्षेत्रात ठाणे महानगर पालिका आणि नगरसेवक आदींच्या माध्यमातून या लोकांना अन्नधान्य व जेवण पुरविले जाते आहे. शाळा, मोकळ्या इमारती, दादोजी कोंडदेव स्टेडियम आदी ठिकाणी त्यांची व्यवस्था केली आहे. मुंबईतून आलेल्या मजुरांचे अनेक तांडेही ठाण्याचा आश्रय घेत आहेत. आता केंद्राच्या धोरणानुसार या मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. राज्याने ही जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर सोपविली आहे. त्यानुसार पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सर्व परिमंडळांना याच्या सूचना दिल्या असून गरजूंना मदत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हे काम अधिक सुलभ व्हावे यासाठी सर्व परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांनी त्या त्या परिमंडळातील नगरसेवकांच्या बैठका घेण्यास सुरु वात केली आहे. तर सर्व नगरसेवकांच्या कार्यालयात अर्ज भरून घेण्यासाठी मजुरांची गर्दी वाढू लागली आहे. काही नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात आरोग्य शिबीर घेऊन गरजूंना ताप आणि इतर आजारांची लक्षणे नसल्याचे वैद्यकीय दाखला देण्याचे सुद्धा काम सुरू केले आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे एकत्र करून ते मजुरीसाठी पोलीस आयुक्तालयात पाठविली जाणार आहेत. नगरसेवकांच्या प्रभागात मोकळ्या जागेत ही कामे सुरू झाल्याने अर्ज भरून आणि डॉक्टरांकडून तपासून घेण्यासाठी परराज्यातील लोकांच्या लांबच लांब रांगा लागू लागल्या आहेत. ठाणे महानगर पालिका क्षेत्रात १३० नगरसेवक आहेत. त्यांचा या कामासाठी चांगला उपयोग होत आहे.
- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश आले आहेत की, परराज्यातील मजूर आणि कामगार यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी त्यांना सहकार्य करा. त्यासाठी सरकारने एक कार्यपद्धती तयार केली आहे. ती पद्धती ग्रुपलीडरला समजाऊन सांगितली जात आहे. त्यांच्यार्फत जमा झालेले अर्ज संबंधित कार्यालयात पाठवून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
- संदीप घोसाळकर, सहायक पोलीस आयुक्त
- माझ्या प्रभागात राहत असलेल्या परराज्यातील मजुरांची व इतर सर्व लोकांची काळजी घेत आहे. रोज ५०० जणांना जेवण पुरविते. आजवर दीड महिन्यात हजारो गरजूंना जीवनावश्यक वस्तूंवर मोफत वितरण केले आहे. सरकारच्या निर्देशाने परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविले जाणार आहे. त्यासाठी त्यांना लागणाºया प्रमाणपत्रांसाठी सहकार्य केले जाते. याबाबत पोलिसांनी मार्गदर्शन केले आहे.
- प्रमिला केणी, विरोधीपक्ष नेत्या, ठामपा.