ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात म्युकरमायकोसिस आजाराच्या ५ रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली आहे. परंतु, संभाव्य धोका लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने या आजाराला रोखण्यासाठी किंवा अशा प्रकारच्या रुग्णांवर तत्काळ उपचार व्हावेत, या उद्देशाने तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार, वॉर्डबॉय, आया अशी ८४ पदे कंत्राटी स्वरूपात भरण्यात येणार आहेत. कळवा रुग्णालयातील एक वॉर्डही यासाठी आठ दिवसांत सज्ज केला जात आहे.
कोरोनापाठोपाठ आता ठाण्यासह जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६४ रुग्ण आढळले असून त्यातील ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात पाच रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. परंतु आता ठाणे महापालिकेने ठोस पावले उचलून कळवा रुग्णालयातही यासाठी एक वॉर्ड राखीव ठेवल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यानुसार याठिकाणी सर्वप्रकारची तयारी पूर्ण झालेली आहे. येथील डॉक्टरांनादेखील तशा सूचना केल्या आहेत. तसेच ओपीडीवर येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची योग्य तपासणी सुरू झाली आहे. औषधांची जुळवाजुळव करण्याची तयारी, इतर सामुग्री मागविली जात आहे. येत्या सात ते आठ दिवसांत ही यंत्रणा सज्ज केली जाणार आहे. या आजाराच्या उपचारासाठी रुग्णाला दोन आठवड्यांचा कालावधी जात आहे. त्यासाठी कळवा रुग्णालयात कान, नाक, घसा, फिजिशियन, न्यूरोलॉजिस्ट आहेत. तसेच जे डॉक्टर नाहीत, त्यांची उपलब्धता केली जाणार आहे.
या संभाव्य आजाराचा धोका लक्षात घेऊन डॉक्टर, नर्सेसची फौज उभी करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार ८४ जणांचा स्टाफ हा कंत्राटी स्वरूपात उभा केला जाणार आहे. यामध्ये एमडी मेडिसिन तज्ज्ञ ३, एमडी अनेस्थेशिया - एमडी मेडिसिन ४, एमडी ऑपथोलॉन १, एमडीएस तज्ज्ञ १, एमडी न्यूपरोलॉजिस्ट २, ईएनटी सर्जन १, एमडी अनेस्थेशिया १, स्टाफ नर्स ४०, ओटी अटेंडन्स ४, वॉर्डबॉय, आया - १२ आणि सफाई कामगार १५ अशी पदे कंत्राटी स्वरूपात भरली जाणार आहेत.
..........
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात या आजाराच्या दृष्टिकोनातून एक वॉर्ड तयार केला आहे. तसेच औषधांची जुळवाजुळव इतर साहित्य आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीमही सज्ज करण्यात येत आहे.
(डॉ. भीमराव जाधव -अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय)