महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना, काँग्रेसचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:19 PM2020-02-23T23:19:19+5:302020-02-23T23:19:38+5:30

अनेक नगरसेवकांचे फोन बंद, घोडेबाजार तेजीत, आज अर्ज भरले जाणार

Army, Congress councilors leave for unknown places | महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना, काँग्रेसचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना

महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना, काँग्रेसचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना

Next

भार्इंदर : मीरा- भार्इंदर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक २६ फेब्रुवारी रोजी होणार असून शिवसेनेच्या दोन नगरसेविका व काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा थांगपत्ता लागत नसल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेनेने त्यांच्या नगरसेवकांना लोणावळा येथे हलवले असून भाजपचे नगरसेवक गोव्याला गेले आहेत. भाजपचे नगरसेवक फुटतील अशी धास्ती असतानाच सेना व काँग्रेसच्या नगरसेवकांना फोडण्यात आल्याने घोडेबाजार तेजीत असल्याची चर्चा आहे.

सोमवारी ३ ते ५ या वेळेत महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज भरायचे आहेत. शिवसेनेच्या नगरसेविका अनिता पाटील व दीप्ती भट तर काँग्रेसचे नगरसेवक नरेश पाटील व अमजद शेख बेपत्ता आहेत. त्यांचे फोन बंद असून अनिता, नरेश व अमजद हे भाजप नगरसेवकांसोबत गोव्याला असल्याची चर्चा आहे. शिवसैनिक पाटील व भट यांचा शोध घेत आहेत. काँग्रेसच्या सारा अकरम यांचा भ्रमणध्वनी बंद असला तरी त्या संपर्कात असल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगितले जात आहे. तर काँग्रेस नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न करणारे भाजप नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांच्या विरोधात नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली आहे.

शिवसेनेच्या दोन नगरसेविका बेपत्ता असल्याने सेनेने शुक्रवारी रात्री आपल्या अन्य नगरसेवकांना खबरदारी म्हणून लोणावळा येथे हलवले आहे. काँग्रेसचे नगरसेवक मात्र मीरा रोडमध्येच आहेत. भाजपमध्ये महापौर व उपमहापौर पदांवरुन जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या महापौरपदासाठी माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक रुपाली मोदी यांचे नाव आघाडीवर आसताना भाजपच्या नीला सोन्स यांनी स्पर्धेत उडी घेतल्याने मेहता व समर्थक नगरसेवकांना नीला यांच्या बाजूने कौल द्यावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्येष्ठ नगरसेविका ज्योत्स्ना हसनाळे तसेच दौलत गजरेही स्पर्धेत असले तरी नीला मैदानात उतरल्याने त्याचे नाव चर्चेत आले आहे. परंतु हसनाळे ज्येष्ठ असल्याने त्यांना उमेदवारी देण्याची मागणी अनेक नगरसेवकांची आहे.

उपमहापौरपदासाठी मेहता समर्थक पाटील यांचे नाव मेहतांकडून निश्चित केल्याचे मानले जात असले तरी अनेक नगरसेवकांनी ध्रुवकिशोर यांच्या नावाला विरोध केल्याचे समजते. ज्येष्ठ नगरसेविका रिटा शाह, प्रभात पाटील, मदन सिंह, सुरेश खंडेलवाल, हसमुख गेहलोत, रवी व्यास, विद्यमान उपमहापौर चंद्रकांत वैती आदी इच्छुकांची नावे चर्चेत आहेत.

नगरसेवकांनी केली कानउघाडणी
ज्येष्ठ व अनुभवींना डावलता. आतापर्यंत केवळ आश्वासनेच दिली गेली. नवीन आलेल्यांना मात्र महत्वाची पदे सतत दिली गेली अशी कान उघाडणी काही नगरसेवकांनी गोवा येथे केल्याचे समजते. उद्या अर्ज भरण्याची मुदत असल्याने भाजपमधील इच्छुकांना गोव्यातच अडकवून ठेवत ज्यांना उमेदवारी द्यायची त्यांचे अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Army, Congress councilors leave for unknown places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.