लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील भात पिकावर बगळ्या रोगासह पाने गुंडाळणारी अळी, खोडकीड या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात झाला आहे. त्यावरील उपाययोजनांसह शतकऱ्यांना कीडरोगांची ओळख करून देण्यासह त्यांना प्रशिक्षित करून त्यांचे वेळीच व्यवस्थापन आणि कीड प्रादुर्भावावरील जागरूकता करून पुढील संभाव्य धोके टाळून उत्पादनात वाढ करण्याच्या हेतूने जिल्ह्यात आता १०८ कृषी सहायक, १८ पर्यवेक्षक आदी १२६ कृषी तज्ज्ञ शेतकऱ्यांसोबत तैनात केले आहेत.
''जिल्ह्यातील ६५० हेक्टर भात पिकावर बगळ्यासह किडरोगाचा प्रादुर्भाव!'' या मथळ्याखाली ‘लोकमत’ने २३ ऑगस्टला वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन कृषी विभागाने जिल्ह्यात १०८ कृषी सहायक व १८ कृषी पर्यवेक्षक अशा सव्वाशे कृषी अधिकाऱ्यांद्वारे जिल्ह्यातील पिकांचे सर्वेक्षण हाती घेतले आहे. शेतकऱ्यांमधील जागरुकतेसाठी टिओएफच्या पूर्वप्रशिक्षित प्रवर्तकांची २० नावेदेखील निश्चित केली आहेत. जिल्ह्यातील या कीड सर्वेक्षक व कृषी पर्यवेक्षकांच्या कामावर देखरेखीसाठी पालघरच्या डहाणू तालुक्यातील प्रादेशिक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल या कृषी विज्ञान केंद्राचीदेखील निवड केली आहे.
भात पिकाचे सर्वेक्षण करून हंगामनिहाय या प्रमुख किडरोगांच्या प्रादुर्भावावर वेळीच उपाययोजना सुचविणे, कीडरोग या प्रादुर्भावित क्षेत्रासाठी पीक संरक्षण औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत. यामुळे कीडरोगांच्या या आकस्मिक प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आता टाळता येणार आहे. यासाठी जिल्ह्यात ''क्रॉपसॅप'' योजनेअंतर्गत फेरोमन ट्रॅप ११३१ व ल्युर्स- ३३९३ निविष्ठांचा पुरवठा झाला आहे. या आपत्कालीन परिस्थितीत या कीड रोगाच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस २० टक्के ईसी-१५० लि., इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसएल १० लि., कार्बन्डेझिम ५० टक्के डब्लूपी-५० किलो आदींचा पुरवठा कृषी विभागाकडून तालुकानिहाय केल्याचे ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी सांगितले.