ठाणे - प्रारंभ कला अकॅडमीतर्फे महिलांमध्ये कॅन्सरविषयी जनजागृती केली जाते. ग्रामीण भागात राहणाऱ्या, घरकाम करणाऱ्या महिला या स्वत:च्या आरोग्याबाबत सजग नसतात. हेच लक्षात घेत प्रारंभ कला अकॅडमीतर्फे विविध आर्थिक स्तरांतील महिलांसाठी १७, १८ आणि २० ऑगस्ट राेजी स्त्रीरोगविषयक मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर सिंधी शाळा, महादेव मंदिराजवळ, कोपरी गाव, ठाणे पूर्व येथे होणार आहे.
प्रारंभ कला अकॅडमीतर्फे गेली काही वर्षे महिलांसाठी आरोग्य सखी हा उपक्रम राबवत आहे. ठाण्यातील विविध आदिवासी पाडे, ग्रामीण भाग येथे ही शिबिरे आयोजित केली जातात. तसेच घरकाम करणाऱ्या महिलाही कामाच्या गाेंधळात किंवा आर्थिक अडचणींमुळे आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. अशा विविध स्तरातील महिलांसाठी हे शिबिर आयोजिले आहे. प्रारंभ आणि एक्सपान्शन इंटरनॅशनल प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होणार आहे. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी २, १८ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ आणि २० ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ यावेळेत सुमारे १५० ते २०० महिलांची तपासणी केली जाणार आहे. पॅपस्मेर सोनोग्राफी, मॅमोग्राफी या सगळ्या कॅन्सरशी संबंधित तपासण्याही करण्यात येणार आहेत.
डॉ. रेखा थोटे, डॉ. गीतांजली आमिन, डॉ. संगीता आरणके हे तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत. कॅल्शियम तसेच आयर्नयुक्त गोळ्यांचे वाटपही करण्यात येणार आहे. या उपक्रमाला नंदिनी विचारे, मालती पाटील, शर्मिला पिंपळोलकर, नम्रता पमनानी यांचे सहकार्य लाभले आहे, अशी माहिती प्रारंभ कला अकॅडमीच्या संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांनी दिली.