भार्इंदर : मीरा-भार्इंदर शहरातील खाडी व समुद्र किनाऱ्यावर जमा होणा ऱ्या मासेमारीच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी स्वतंत्र व्यवस्था करा, या मागणीसाठी उत्तन कोळी जमात संस्थेच्या शिष्टमंडळाने पालिका सभागृह नेता रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त बी. जी. पवार यांची बुधवारी भेट घेतली.
शहराच्या पश्चिमेला सुमारे ५ ते ७ किलोमीटर समुद्र किनारा असुन उत्तरेला भार्इंदर खाडी तर दक्षिणेला जाफरी खाडी आहे. यातील भार्इंदर खाडी व पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी केली जाते. पश्चिम किनारपट्टीवर मासेमारीचे प्रमाण मोठे असुन येथील मासळी देशांतर्गत तसेच परदेशात मोठ्याप्रमाणात निर्यात केली जाते. या किनाऱ्यावर मासळीचा कचरा मोठ्याप्रमाणात निर्माण होत असल्याने तो दररोज उचलण्याऐवजी दिवसाआड अथवा दोन दिवसांनी पालिकेकडुन उचलला जात असल्याचे स्थानिक मच्छिमारांकडुन सांगितले जाते. त्यातच समुद्र व खाडीतील पाण्यासोबत त्यातील कचरा किनाऱ्यावर वाहून येतो. तो तसाच पडून राहिल्याने किनाऱ्यावर घाणीचे साम्राज्य पसरुन दुर्गंधी सुटते. दरम्यान स्थानिक मच्छिमार महिलांनी किनाऱ्यावर साठलेला कचरा स्वच्छ करण्याची मोहिम सुरु केली होती. त्याची कुणकूण लागताच पालिकेने किनाऱ्यावर जमा होणारा दररोज उचलण्यास सुरुवात केली. सध्या मात्र परिस्थिती पुर्वीसारखीच झाल्याचा दावा स्थानिक मच्छिमारांकडुन केला जात आहे. भाटेबंदर ते चौक दरम्यान एकुण ८५० मासेमारी बोटी असुन त्यात २२५ मोठ्या बोटी, ३७० जाळीवाल्या बोटी व २५५ लहान बोटींचा समावेश आहे. दिवसाला किनाऱ्यावर येणाऱ्यामासळीचे प्रमाण सुमारे १ हजार ७०० टन इतके असुन १५० बोटींद्वारे प्रत्येकी १० टनप्रमाणे १ हजार ५०० टन मासळी, १२५ जाळीवाल्या बोटींद्वारे प्रत्येकी १ टनप्रमाणे १२५ मासळी व २०० लहान बोटी प्रत्येकी ५०० किलोप्रमाणे १०० टन मासळी एका दिवसात किनाऱ्यावर आणतात. यातील सुमारे ५ टन टाकाऊ वा खराब मासळीचा कचरा किनाऱ्यावर जमा होतो. हा कचरा स्वतंत्रपणे उचलण्यासाठी पालिकेकडे व्यवस्था नसल्याने तो इतर कचऱ्यासोबतच उचलला जातो. हा कचरा परिसरातीलच घनकचरा प्रकल्पात टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे या कचऱ्याच्या स्वतंत्र विल्हेवाटीची व्यवस्था मासेमारी तसेच मासळी बाजाराच्या ठिकाणीच करावी, अशी मागणी उत्तन कोळी जमात संस्थेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांकडे लेखी स्वरुपात केली आहे. रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात गावपाटील कल्मेत गौऱ्या, संस्थेचे सचिव डिक्सन डिमेकर, हॅन्ड्रीक गंडोली, सिडनी पिला, संजय श्रावण्या, हिटलर गोसाल, हॅरल व गॅवियन जेलका यांचा समावेश होता.